breaking-newsमहाराष्ट्र

आपली विविध प्रकारची स्वातंत्र्ये आज धोक्यात; सहगल यांच्या प्रस्तावित भाषणातील निवडक मुद्दे

साहित्य अकादमी पुरस्कारविजेत्या लेखिका नयनतारा सहगल यांचे निमंत्रण रद्द करण्यात आल्यामुळे त्यांचे भाषण आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर वाचले जाणार नाही. या संमेलनात उद्घाटक म्हणून सहगल यांनी त्यांचे भाषण आयोजकांना पाठवले होते. हेच प्रस्तावित भाषण प्रसारमाध्यमांच्या हाती लागले आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरु नयनतारा सहगल जे विचार, भूमिका मांडणार होत्या. त्याच भाषणातील काही निवडक मुद्दे.

– आपली विविध प्रकारची स्वातंत्र्ये आज धोक्यात आहेत. या स्वातंत्र्यांना असलेल्या धोक्यांनी माझ्या मनात एवढे वादळ उठवले आहे, की आज इथे तुमच्यासमोर काय बोलायचे याचा विचार करत असताना, सध्या भारतामध्ये जे काही चालले आहे त्याबद्दलच तुमच्याशी बोलायला हवे हे माझ्या लक्षात आले. याचे कारण म्हणजे, या गोष्टी आपल्या जीवनाच्या प्रत्येक बाबीवर वाईटरित्या परिणाम करत आहेत; आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच, आपण ईश्वराची प्रार्थना कशी करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत.

– धार्मिक विविधता मोडून काढून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहते आहे.

– सरकारचा पाठिंबा असलेला जमावाचा हा हिंसाचार बचावहीन लोकांविरूद्ध अनेक ठिकाणी सुरू आहे आणि त्यातल्या दोषींना शिक्षा होत नाहीत. काही प्रसंगांमध्ये उलट बळी पडलेल्या लोकांवरच गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही ठिकाणी गुन्हेगारांचे कौतुक झाले आहे.

– भारतीयांच्या मनामध्ये भीती आणि दुःख दाटण्याचा काळ आता आला आहे. त्यांच्यापैकी जे गरीब आणि असहाय्य आहेत. ज्यांना त्यांच्या गावांतून, घरांतून आणि नोकऱ्यांमधून हाकलून देण्यात आले आहे  ते लोक कामधंदा, मदत, आशा किंवा भवितव्याविना जगत आहेत.

– आपण सर्व लेखक असल्यामुळे, सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये आपल्या लेखक आणि कलावंत भाईबंदांच्या बाबतीत काय घडते आहे त्याकडे लक्ष देऊ या. प्रश्न विचारणारे मन, सृजनात्मक कल्पनाशक्ती आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य यांना सध्याच्या राजकीय वातावरणामध्ये काहीही स्थान नाही हे आपण पाहतोच आहोत आणि जिथे विचारस्वातंत्र्य किंवा लोकशाही हक्कांप्रती आदर नसतो, तिथे लेखन ही एक धाडसी, धोकादायक कृती बनते. जगभरातल्या हुकूमशाही राजवटींमध्ये नेहमी असेच घडत आले आहे. तिथे कला ही सरकारी नियंत्रणाखाली ठेवली जाते आणि लेखकांनी जर त्यांच्या लक्ष्मणरेषेच्या बाहेर पाऊल टाकले, तर त्यांना शिक्षा होण्याची किंवा छळ होण्याची भीती असते.

– तीन प्रमुख बुद्धिप्रामाण्यवादी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांना तर्कबुद्धीची कास धरून अंधश्रद्धांना नकार दिल्याबद्दल गोळ्या घालून ठार मारण्यात आले आणि बंगळुरूमध्ये स्वतंत्र विचार आणि हिंदुत्वाला विरोध असल्यामुळे गौरी लंकेशला ठार मारण्यात आले. आणखी काहींना ठार मारण्याच्या धमक्या देऊन लिहिण्यापासून परावृत्त करण्यात आले आहे. आपल्याला सांगितले जाते, ‘तुमचे पुस्तक प्रकाशित करू नका, अन्यथा आम्ही ते जाळून टाकू. तुमची चित्रे प्रदर्शित करू नका, अन्यथा आम्ही तुमचे चित्रप्रदर्शन उध्वस्त करू.’ चित्रपटकर्त्यांना सांगितले जाते, ‘अमुक दृश्यामधले संवाद बदला आणि तमुक दृश्य काढून टाका, अन्यथा आम्ही तुमचा चित्रपट दाखवला जाऊ देणार नाही आणि तरीही तुम्ही तो प्रदर्शित केला, तर आम्ही सिनेमागृहाची तोडफोड करू. आमच्या भावना दुखावतील असे काही करू नका.’ निराळ्या शब्दांत, ‘आम्ही सांगू तसे करा अन्यथा तुमचे जीवन आणि तुमची कला सुरक्षित राहणार नाही.’ पण सर्जनात्मक कल्पनाशक्ती सरकार किंवा जमावाकडून आदेश स्वीकारू शकत नाही.

– आता भारताचा इतिहास सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्यावर इतिहासकारांना त्याची धग जाणवू लागली आहे. काही राज्यांमध्ये इतिहासाच्या मोठ्या-मोठ्या भागांची तोडमोड तरी करण्यात आली आहे किंवा ते पूर्णपणे गाळूनच टाकण्यात आले आहेत. आणि हा सगळा खास इतिहासाचे पुनर्लेखन करण्याकरताच निवडलेल्या हिंदुत्ववादी मनांचा उद्योग आहे.

– पुनर्लिखित इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांपैकी काही पुस्तकांमध्ये संपूर्ण मुघल साम्राज्यच पुसून टाकले आहे आणि निव्वळ इतिहास पुसून समाधान न झाल्यामुळे, त्याचे संपूर्ण नामोनिशाणही उध्वस्त करणे चालले आहे. बाबरी मशीद पाडली गेली आणि गावे व रस्त्यांची मुघल व मुस्लिम नावे बदलली जात आहेत. काही पाठ्यपुस्तकांमध्ये, ज्यांच्या सरकारने आधुनिक भारताची पायाभरणी केली त्या नेहरूंच्या सर्व प्रकारच्या उल्लेखांना चाळणी लावण्यात आली आहे.

– स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण उभ्या केलेल्या महत्त्वाच्या संस्थांचा आपल्याला रास्त अभिमान वाटत होता, पण त्यासुध्दा सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या आहेत. मग त्या कला आणि साहित्याशी संबंधित असोत, वा इतिहासाशी, वा तंत्रज्ञान, विज्ञान, माहिती, शिक्षण वा संस्कृतीशी संबंधित असोत. सार्वजनिक विद्यापीठे, संग्रहालये आणि अकादम्या आता स्वायत्त उरलेले नाहीत. दिल्लीतले नेहरू मेमेरियल म्युझियम आणि ग्रंथालय, हे आपल्या संस्था कशा बिघडवल्या जात आहेत, याचे अगदी सुरूवातीचे उदाहरण आहे. आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठ हिंदुत्ववाद्यांच्या द्वेषाचे नित्यनैमित्तिक लक्ष्य आहे. एक हिंदू आणि सनातन धर्म नावाच्या महान, ज्ञानप्रकाशी वारश्यावर श्रद्धा असलेली व्यक्ती म्हणून मी हिंदुत्व स्वीकारू शकत नाही.

– लेखक हस्तिदंती मनोऱ्यामध्ये राहात नसतात. त्यांच्या लिखाणातून सुष्ट आणि दुष्ट, उचित आणि अनुचित यांच्या द्वंद्वामध्ये ते ठामपणे एक बाजू घेत असतात. जगभरातील अनेक देशांमधील लेखकांनी लिहिलेले महान साहित्य हेच कार्य करत आलेले आहे आणि हेच साहित्य पिढ्यानपिढ्या लोकांच्या हृदयाला स्पर्श करत आलेले आहे. तेच अजूनही जिवंत आहे. आपण कुठे उभे आहोत हे आपण निवडत असलेल्या विषयांमधून, आपण लिहित असलेल्या कथांमधून आणि आपण त्या ज्या पद्धतीने लिहितो त्यातून, आपण दाखवून देत असतो.

– लेखकांचा निषेध तीन वर्षांपूर्वी पुरस्कार वापसी चळवळीच्या रूपात सुरू झाला. आम्ही सुमारे शंभर जणांनी, पुरस्कार विजेते लेखक डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ आमचे साहित्य अकादमी पुरस्कार परत केले. अकादमीने याची काहीही दखल घेतली नाही. पण दिल्लीजवळच्या दादरी गावातील एक गरीब लोहार मोहंमद अखलाक याची जमावाने हत्या केल्यानंतर आमची ही चळवळ वाढली आहे आणि लोकशाही व मानवी हक्कांवरील हल्ल्यांशी संबंधित अन्य घटनांपर्यंत तिची व्याप्ती वाढली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button