breaking-newsराष्ट्रिय

…आणि व्यंकय्या नायडू यांना राज्यसभेमध्ये रडू आले!

राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांना सोमवारी सभागृहाचे कामकाज सुरु असतानाच रडू आले. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण करताना नायडू भावुक झाल्याचे पहायला मिळाले. हैदराबाद येथील एका खासगी रुग्णालयात रेड्डी यांचे रविवारी निधन झाले.

रेड्डी यांना राज्यसभेमध्ये श्रद्धांजली अर्पण करताना नायडू यांना गहिवरुन आले. ‘रेड्डी चांगले प्रवक्ते आणि प्रशासक होते. आंध्र प्रदेशच्या विधानसभेमध्ये त्यांच्या सोबत काम करण्याची मला संधी मिळाली. आम्ही दोघेही एकाच बाकावर बसायचो. आम्ही आमच्या पद्धतीने लोकांच्या प्रश्नांवर चर्चा करायचो,’ अशा शब्दांमध्ये नायडू यांनी रेड्डीबरोबरच्या ४० वर्षांच्या मैत्रीचा दाखला दिला.

‘रेड्डी माझे चांगले मित्र होते त्याचबरोबर माझे वरिष्ठ सहकारी म्हणून त्यांनी मला अनेकदा मार्गदर्शनही केले आहे. मी त्यांच्यापेक्षा वयाने सहा वर्षांनी लहान आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे,’ असं नायडू यांनी सांगितले. सभागृहातील सदस्यांनी दोन मिनिटं शांत उभं राहून मौन बाळगत रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

त्यानंतर पुन्हा एकदा नायडू यांनी रेड्डीबरोबरचे जुने दिवस कसे होते याबद्दलच्या आठवणींना उजाळा दिला. ‘आंध्र प्रदेश विधानसभेचे अधिवेशन सकाळी आठ वाजता असायचे. आम्ही दोघे मात्र सकाळी सात वाजताच नाश्त्यासाठी भेटायचो. त्यावेळी आम्ही अनेक विषयांवर चर्चा करायचो. यामध्ये रेड्डी यांचे विषयाबद्दलचे असणारे ज्ञान, विषयाची समज, भाषेवरील प्रभुत्व या सारख्या गोष्टी प्राकर्षाने जाणवायच्या,’ असं म्हणतच नायडू यांच्या डोळ्यातून आश्रू आले. ‘मला माफ करा मागील ४० वर्षांपासून माझे रेड्डी यांच्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध असल्याने मला भावना अनावर झाल्या,’ असं म्हणत नायडू यांनी आपले बोलणे थांबवले.

कोण होते जयपाल रेड्डी

१९६९ ते ८४ या काळात चार वेळा आंध्र प्रदेश विधानसभा सदस्य, पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व व दोनदा राज्यसभा सदस्य अशी सुदिनी जयपाल रेड्डी यांची कारकीर्द होती. १९९१-९२ मध्ये ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. १९९८ मध्ये उत्तम संसदपटू म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले होते. आपल्याला जे पटेल ते मांडत राहिले, त्या अर्थाने त्यांनी तत्त्वाचे राजकारण केले. तेलंगणा राज्याचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या जयपाल रेड्डी यांचा राजकीय प्रवास जनता पक्ष, पुढे जनता दल ते काँग्रेस असा होता. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी यांना विरोध करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. १९८० साली जनता पक्षातून मेडक मतदारसंघातून इंदिराजींच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली. पुढे जनता दलात ते सामील झाले. भाषेवर कमालीचे प्रभुत्व व उत्तम वक्तृत्वाच्या जोरावर युनायटेड फ्रंट, नॅशनल फ्रंट तसेच पुढे काँग्रेसचे ते प्रवक्ते होते. १९९८ त्यांना सर्वोत्तकृष्ट संसदपटू हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९९ मध्ये ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले. माहिती प्रसारण, नगरविकास, पेट्रोलियम ही खाती त्यांनी केंद्रात भूषवली. युनायटेड फ्रंट सरकारमध्ये माहिती प्रसारण खाते सांभाळतानाच प्रसारभारती या स्वायत्त संस्थेची उभारणी झाली.

त्या काळातील त्यांच्या वक्तृत्वाची हातोटी काही पत्रकार सांगतात. १९९७-९८ मध्ये रेड्डी हे संयुक्त आघाडी (युनायटेड फ्रंट) सरकार व जनता दल यांचे प्रवक्ते होते. सरकारबाबत अडचणीचा प्रश्न विचारला, की मी पक्षाचा प्रवक्ता आहे अन् पक्षाबाबत विचारला तर मी सरकारचा प्रवक्ता आहे, असे सांगण्याचा मुरब्बीपणा त्यांच्याकडे होता. २००२ मध्ये लोकसभेत त्यांनी ‘ह्युमंगस’ हा शब्द वापरला. त्याचा अर्थ इतरांना माहीत नसल्याने गदारोळ झाला. नंतर दोन दिवसांनी रेड्डी यांनीच, तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा संदर्भ देत या शब्दाचा अर्थ विशद केला. मग कामकाजातही हा शब्द कायम राहिला! २०१० मध्ये तेलंगण राज्यासाठी आंदोलन सुरू होते तेव्हा जयपाल रेड्डी हे राज्यातील काँग्रेस नेत्यांचे मार्गदर्शक होते. राजकारणात घराणेशाहीच्या विरोधात ते होते. त्यामुळेच आपल्या मुलांना वा भावांना राजकारणापासून त्यांनी दूर ठेवले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button