breaking-newsमुंबई

अबू आझमींना अटक करण्याची किरीट सोमैयांची मागणी

मुंबई : नागपाड्यात स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याबद्दल समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना अटक करण्याची मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी केली आहे. तसेच अबू आझमी यांच्यावर कारवाई करण्याऐवजी महिला पोलीस अधिकाऱ्याची बदली केल्याबद्दल त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

२६ मे रोजी रात्री समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी नागपाडा पोलीस स्टेशनबाहेर स्थलांतरित मजुरांना जमवून प्रक्षोभक भाषण केले आणि लॉकडाऊन दरम्यान लागू असलेला अपत्ती व्यवस्थापन कायदा मोडला, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. त्यावेळी त्यांनी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. या अधिकाऱ्याने त्यांचे ऐकले नाही म्हणून संबंधित महिला अधिकाऱ्याला वाईट शब्दांत शिवीगाळ केली, असा आरोप सोमैया यांनी केला आहे. याबाबतचा व्हिडिओही सोमैया यांनी ट्वीट केला असून अबू आझमी यांच्याविरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे.

महिला पोलिसांना शिवीगाळ करणे, अपमान करणे त्याबरोबरच भारतीय दंडविधान कलम १८८ अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी सोमैया यांनी केली आहे. आझमी यांच्यावर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला आहे. पोलीस उपायुक्त, तसेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडेही सोमैया यांनी तक्रार केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button