अपुरे कामकाज असूनही एम्पायर उड्डाणपुलाचे उद्घाटन
पिंपरी – चिंचवड येथील एम्पायर इस्टेट उड्डाणपुलाचे उदघाटन सोमवारी करण्यात आले. परंतु या उड्डाणपुलाची अनेक कामे अर्धवट अवस्थेत असून राडारोडा देखील तसाच पडला आहे. तरीही सत्ताधारी भाजपने पुलाचे लोकार्पण करण्यास घाई केली आहे. त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात जागरूक नागरिक मंचचे संयोजक अशोक मंगल यांनी म्हटले आहे की, नव्याने सुरु झालेला हा उड्डाणपूल पाहण्यासाठी आम्ही गेलो. मात्र ब-याच ठिकाणी नवीन पुलाचे काम अपुरे असून राडारोडा पडलेला दिसून आला. त्यामुळे या वास्तूच्या उदघाटनामुळे निर्माण झालेला आमचा उत्साह मावळला. ही कामे महापालिकेने तातडीने पूर्ण करुन स्वच्छ व सुंदर उड्डाणपूल नागरिकांना द्यावा. तसेच काळेवाडी फाटा ते देहु आळंदी रस्ता यामार्गावर या महत्वाच्या उड्डाणपुलाचे काम ऑटो क्लस्टरजवळ काही कंपन्याच्या इमारतीमुळे रखडले आहे. या इमारतीच्या दोन्ही बाजूचे रस्ते पूर्ण तयार आहेत. परंतु कंपनीच्या जागेबाबत तोडगा निघालेला नाही. त्यामुळे हा बीआरटी मार्ग कसा सुरु होणार, असा प्रश्न देखील अशोक मंगल यांनी उपस्थित केला आहे.