breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

अपयश झाकण्यासाठीच मोदींकडून अपप्रचार

  • अशोक चव्हाण यांचे प्रत्युत्तर

  • मोदींना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही

मुंबई – आरएसएस आणि भाजपच्या नेत्यांना आणीबाणीबद्दल बोलण्याचा हक्क नाही. स्वतःच्या सरकारचे गेल्या चार वर्षातील सर्वच आघाड्यांवरचे अपयश झाकण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप कॉंग्रेस विरोधात अपप्रचार करत आहेत. कॉंग्रेस त्यांच्या या अपप्रचाराला सडेतोड प्रत्युत्तर देईल असा इशारा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत तत्कालीन कॉंग्रेसच्या इंदिरा गांधी सरकारने लादलेल्या आणीबाणीवर भाष्य करताना गांधी कुटुंबाला लक्ष्य केले होते. त्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.
केंद्रात सत्तेवर आल्यापासून गेल्या चार वर्षांत देशावर अघोषीत आणीबाणी लादणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा नैतिक अधिकार नाही. देशात भाजपचे सरकार सत्तेवर आल्यापासून दलित, अल्पसंख्यांक, आदिवासी यांना वेठीस धरले जात आहे. दलितांवरील अत्याचारात प्रचंड मोठी वाढ झाली आहे. दिवसाढवळ्या पत्रकार, विचारवंत, लेखकांच्या हत्या केल्या जात आहेत. देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे.

बेरोजगारीत बेसुमार वाढ होत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोही ठरवले जात आहे. कोणी काय खायचे, कोणते कपडे घालायचे यावर नियंत्रणे आणली जात आहेत. गोमांस बाळगल्याच्या संशयावरून हत्या केल्या जात आहेत. देशातल्या घटनात्मक संस्थाची स्वायत्तता मोडीत काढली जात आहे. न्यायव्यवस्थेवरही सरकारकडून दबाब आणला जात आहे, याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले.

एकंदरीतच आज देशात आणीबाणीची परिस्थिती असून याविरोधात देशातल्या जनतेमध्ये तीव्र असंतोष असून यावरून जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्यासाठी भाजपकडून 43 वर्षापूर्वीच्या आणीबाणीचा संदर्भ देऊन काळा दिवस साजरा केला जात आहे. पण मोदींच्या कार्यकाळात गेल्या चार वर्षापासून देशातली जनता काळे दिवस भोगत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

म्हणून चहावाला पंतप्रधान होऊ शकला… 
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी या देशातली लोकशाही बळकट केली म्हणूनच एक चहावाला या देशाचा पंतप्रधान होऊ शकला हे नरेंद्र मोदी कसे विसरू शकतात? असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी इंदिरा गांधी सारखा दुसरा नेता झाला नाही, अशा शब्दात त्यांची स्तुती केली होती. माजी सरसंघचालक दिवंगत बाळासाहेब देवरस आणि वाजपेयींसारख्या अनेक नेत्यांनी माफीनामा लिहून देत 20 कलमी कार्यक्रमाला पाठिंबा दिला होत, हे भाजपने विसरू नये असे भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी स्वतःच म्हटले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button