breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

अनुष्का-विराट टिप्पणीबद्दल गावस्करांचं लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान स्पष्टीकरण

दुबई – गुरुवारी आयपीएलमध्ये झालेल्या किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सामन्यादरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माबाबत वक्तव्य करून क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर हे वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. मात्र शुक्रवारी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना गावस्कर यांनी या मुद्द्यावर अधिकचे स्पष्टीकरण दिले. ‘माझं मन साफ आहे, मी कुणालाही दोष दिला नाही’, असे यावेळी गावस्कर यांनी म्हटले.

सुनील गावस्कर हे कॉमेंट्रीदरम्यान विराटच्या खेळीबद्दल बोलत होते. त्याच्या खेळीची मिमांसा करताना त्यांनी ‘विराटने फक्त अनुष्काच्या गोलंदाजीचा सराव केला’, अशी टिप्पणी केली होती. त्यावरून विराटचे चाहते नाराज झाले. तर दुसरीकडे गावस्कर यांच्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावण्यात येतोय, असे त्यांचे समर्थक म्हणत होते. तर अनुष्कानेही सोशल मीडियावर सडेतोड पोस्ट करत त्यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली होती.

या सगळ्यावर स्पष्टीकरण देताना गावस्कर म्हणाले, ‘आम्ही सगळे कॉमेंटेटर खेळाडूंच्या सरावाबद्दल बोलत असताना मी विराटच्या लॉकडाऊनमधील सरावाबाबत बोलून गेलो. त्याचा अनुष्काबरोबरचा बिल्डिंग कम्पाऊंडमधील प्रॅक्टिसचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरूनच मी म्हटले की लॉकडाऊनमध्ये विराटने फक्त अनुष्काच्या बॉलिंगची प्रॅक्टिस केली. माझे फक्त एवढेच शब्द होते. यात मी कुणालाही दोष दिला नाही. माझं मन साफ आहे’, असे ते म्हणाले. त्याचबरोबर ‘माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. तसेच माझ्या वक्तव्याला तोडून मोडून दाखवण्याचा प्रयत्न झाला. अनुष्का आणि विराटला मी सांगू इच्छितो की माझी व्हिडीओ क्लिप तुम्ही पुन्हा एकदा काळजीपूर्वक ऐका’, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

दरम्यान, गावस्करांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त करत अनुष्काने पोस्ट करत लिहिले होते, ‘मिस्टर गावस्कर मी आपला सन्मान करते पण मला तुमची कमेंट आवडली नाही. मी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ इच्छिते. मिस्टर गावस्कर आपण माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळीबद्दल बोलताना माझ्या नावाचा उल्लेख केला. अनेक वर्षांपासून मला माहिती आहे की क्रिकेटर्सच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करता. आपल्याला वाटत नाही का की आम्हीदेखील त्याचे हकदार आहोत? आपण दुसऱ्या कोणत्याही शब्दात माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळावर टीका करू शकला असता. परंतु आपण टीका करत असताना त्यामध्ये माझे नावदेखील घेतले. तुम्हाला काय वाटते तुम्ही हे बरोबर केलंय? सध्या 2020 हे वर्ष सुरू आहे मात्र माझ्यासाठी आजही काही गोष्टी चांगल्या होत नाहीत. माझं नाव नेहमी क्रिकेट कॉमेन्ट्रीमध्ये ओढलं जातं. मी तुमचा खूप सन्मान करते. तुम्ही या खेळाचे लेजेंड आहात. मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते, आपणही समजू शकता की तुम्ही माझं नाव घेतल्यावर मला कसं वाटलं असेल?’, असे अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button