breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अजितदादांचा पहाटेचा शपथविधी आणि शरद पवारांना अमित शहांची ऑफर… संजय राऊतांनी मांडले महानाट्याचे वास्तव

मुंबई – महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाच राज्याच्या इतिहासात पहाटेच्या शपथविधीचे नाट्य घडले होते. या शपथविधी सोहळ्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सविस्तर खुलासा केला आहे. ‘नेहरू सेंटरमध्ये काँग्रेस नेत्यांसोबत वाद झाल्यानंतर अजित पवार हे गायब झाले आणि दुसऱ्या दिवशी राजभवनावर दिसले’ असं राऊत यांनी सांगितले आहे.

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. त्यानुषंगाने शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या रोखठोक सदरात पहिल्यांदाच संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापनेचा घटनाक्रम मांडला आहे. तसंच, अजित पवार यांनी पहाटे कशा प्रकारे शपथविधी उरकला, याची रंजककथाही त्यांनी लिखीत स्वरुपात समोर आणली आहे.

23 नोव्हेंबरला पहाटे राजभवनात देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा शपथविधी झाला. हा रोमांचक, थरारक, तितकाच रहस्यमय चित्रपट ‘गोल्डन ज्युबिली’ चालेल असे दुपारी बारा वाजेपर्यंत अनेकांना वाटत होते, पण पहिल्याच शोला हा चित्रपट कोसळला व त्यानंतर खेळ जास्तच रंगला. महाराष्ट्राच्या राजकारणात इतका रंगतदार व अखेरच्या चेंडूपर्यंत खेळला जाणारा सामना कधीच झाला नव्हता.

सत्तेच्या वाटणीत राष्ट्रवादीला काय मिळत आहे यावरच ‘मल्लिकार्जुन खरगे’ आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे लक्ष होते. नेहरू सेंटरमधल्या 22 नोव्हेंबरच्या वाटाघाटीत मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका वक्तव्याने ठिणगी पडली. विधानसभेचे अध्यक्षपद कोणाकडे ? अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाता कामा नये अशी भूमिका खरगे वगैरे मंडळींनी घेतली. तेथे खरगे व शरद पवार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पवारांना इतके संतापलेले मी प्रथमच पाहिले. ते त्राग्याने टेबलावरचे कागद गोळा करून निघाले. त्यांच्या पाठोपाठ मी व प्रफुल पटेल धावत गेलो. त्याच बैठकीत सुरुवातीला आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील हे पवार यांनीच सुचवले, पण खरगे, पवार चकमकीने बैठकीचा नूर पालटला. यानंतर अजित पवार हे बराच काळ त्यांच्या मोबाईल फोनवर खाली मान घालून ‘चॅटिंग’ करत होते. त्यानंतर तेही बैठकीतून बाहेर पडले. अजित पवारांचा फोन त्यानंतर ‘स्विच ऑफ’ झाला व दुसऱ्या दिवशी पहाटे त्यांचे दर्शन थेट राजभवनावरील शपथविधी सोहळ्यात झाले. फडणवीस-अजित पवारांचा शपथविधी सुरू असतानाच एक महत्त्वाचा फोन मला आला, ‘‘तुमचे सरकार बनत नाही. फडणवीस-अजित पवार शपथ घेत आहेत. अजित पवारांनी एनसीपी फोडली.’

अमित शहा आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्याची अफवाच

‘पहाटे झालेल्या शपथविधीपूर्वी शरद पवार, अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाली, अशा प्रकारचा गौप्यस्फोट होऊन देवेंद्र फडणवीस अशी बैठक झाली व त्यात पहाटेच्या शपथविधीचे ‘नाटय़’ तयार झाले, हे सर्वस्वी चूक आहे. अमित शहा यांच्या घरी एक बैठक झाली. त्यात एक बडे उद्योगपती व राष्ट्रवादीचे नेते असावेत. पवार या काळात दिल्लीत असताना त्यांच्यात व माझ्यात उत्तम संवाद होता व जवळ जवळ रोजच आम्ही भेटत होतो. नक्की कोठे काय सुरू आहे, याचे ‘अपडेटस्’ एकमेकांना देत होतो. भारतीय जनता पक्षाशी कोणतेही डील करण्याच्या मनःस्थितीत मला पवार दिसले नाहीत. ‘‘भाजपकडून सरकार बनविण्यासंदर्भात विविध स्तरांवरून ऑफर्स येत आहेत’’ हे त्यांचे सांगणे होते. ‘‘लवकरच पंतप्रधान मोदी यांना भेटून मी भाजपबरोबर सरकार स्थापन करणे शक्य नाही असे सांगणार आहे’’ हे त्यांनी मला सांगितले. याच काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पवार मोदींना भेटायला गेले व महाराष्ट्रातील सरकार स्थापनेबाबत सांगायचे ते सांगून आले. त्यामुळे पवारांनी भाजपला शब्द दिला होता व त्यानुसार पहाटेच्या हालचाली झाल्या हे खोटेच आहे’ असं म्हणत राऊत यांनी फडणवीस यांचा दावा खोडून काढला आहे.

‘ठाकरे सरकार’ हे घटनेच्या चौकटीत म्हणून नैसर्गिक

‘भाजपचे स्वतःचे व इतर मिळून 112 आमदार असूनही त्यांना विरोधी बाकांवर बसावे लागले. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने महाविकास आघाडीचे सरकार अनैसर्गिक आहे. अनैसर्गिक सरकार लवकरच पडेल असे त्यांचे भाकीत आहे, पण ते कसे पडेल, कोण पाडेल हे सर्व गुप्त कारवाया व राष्ट्रीय तपास यंत्रणांवर अवलंबून आहे. ‘ईडी’सारख्या संस्थांनी स्वतःचे सत्त्व गुंडाळून मालकाचे हुकूम पाळायचे ठरवले तरी महाराष्ट्राचे सरकार टिकून राहील हे मी जबाबदारीने सांगतो. महाराष्ट्रातील सध्याचे अनैसर्गिक सरकार टिकणार नाही असे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील वगैरे नेते सांगतात. राजकारणात कुणी साधुसंत वगैरे नसतो. तसे कोणतेही सरकार हे नैसर्गिक किंवा अनैसर्गिक नसते. जोपर्यंत एखादे सरकार टिकून आहे तोपर्यंत ते नैसर्गिक न्यायाचेच असते. सध्याचे सरकार अस्थिर करण्यासाठी सी.बी.आय., ईडीसारख्या यंत्रणांचा वापर सुरू आहे. बेकायदेशीर बांधकाम, आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखे गुन्हे करणाऱ्यांना अभय दिले जात आहे. हे सर्व राजकीय दाबदबावाचे प्रकार न्यायाचे आणि नैसर्गिक तितकेच ‘ठाकरे सरकार’ही नैसर्गिक मानावेच लागेल. विधानसभेत या सरकारने बहुमत सिद्ध केले आहे. त्यामुळे ते घटनेच्या चौकटीत आहेच’ असंही राऊत म्हणाले.

‘अटल बिहारी वाजपेयी यांनी 33 भिन्न विचारांच्या पक्षांचे ‘एनडीए’ सरकार पाच वर्षे चालवले. त्यात ममता बॅनर्जी होत्या. जयललितांचा पक्षही होता. ते सरकार कुणाला अनैसर्गिक वाटले नाही. मग तिघांचे सरकार निसर्गविरोधी कसे? असा सवाल राऊत यांनी भाजपला विचारला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button