अखेर इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला दिले उत्तर
अहमदनगर | समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असं आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अडचणीत सापडलेल्या कीर्तनकार इंदोरीकर महाराजांनी कायदेशीर नोटीसला अखेर उत्तर दिले आहे.
इंदोरीकर महाराज यांचे वकील शिवडीकर यांनी बुधवारी अहमदनगर जिल्हा रूग्णालयात येऊन कायदेशीर नोटीसला लेखी उत्तर दिले आहे. मात्र जिल्हा रूग्णालयाच्यावतीने यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे. इंदोरीकर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने त्यांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितले होते. या नोटीसला उत्तर देण्याचा आजचा शेवटचा दिवस होता.
त्यानुसार इंदोरीकर महाराजांनी आपल्या वकिलामार्फत लेखी उत्तर दिले आहे. इंदोरीकर महाराजांचे वकील शिवडीकर यांनी महाराजांच्या एका सेवकासोबत बुधवारी जिल्हा रूग्णालयात दाखल होत नोटीसला उत्तर दिले. तसंच, पुढची भूमिका लवकरच स्पष्ट करु, असे देखील शिवडीकरांनी सांगितले. दरम्यान, इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मंगळवारी दिलगिरी व्यक्त केली.
त्यांनी महाराष्ट्रातील तमाम वारकरी, कथाकार, कीर्तनकार, शिक्षक, डॉक्टर, वकील आणि माता-भगिनींना या सर्वांना उद्देशून लेखी पत्र लिहित दिलगिरी व्यक्त केली. माझ्या त्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. तरी सद्धा कोणाचे मन दुखावले असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे इंदोरीकर महाराजांनी लेखी पत्रात म्हटले होते.