breaking-newsक्रिडा

अखेरच्या क्षणी भारताचा पाकिस्तानवर विजय

  • शेवटच्या सेकंदात भारताची एका गुणाने मात

जकार्ता – आशियाई स्पर्धेतील हॅंडबॉल क्रीडा प्रकारात पहिल्या सामन्यात मलेशियाविरुद्ध एकतर्फी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताला चांगलाच संघर्ष करावा लागला. आजच्या सामन्यात क्रिकेट असो वा इतर कोणता खेळ भारत आणि पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील कुठलाही सामना हा थरारकच असतो याची पुन्हा प्रचिती आली. हॅंडबॉल क्रीडा प्रकारातील अटीतटीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अक्षरशः शेवटच्या सेकंदात 28-27 अशा फरकाने पराभव केला.

भारत आणि पाकिस्तान हे संघ गट-3 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यामुळे गटातून अव्वल स्थान पटकावून पुढची फेरी गाठण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस होती. प्रत्यक्ष सामन्यादरम्यान ती क्षणाक्षणाला वाढत गेली. कधी भारताची आघाडी, तर कधी पाकिस्तानची, अशी अटीतटी संपूर्ण सामन्यात रंगली होती. सुरूवातीला 5-2 अशी आघाडी घेणाऱ्या पाकिस्तानशी भारतानं 5-5 अशी बरोबरी केली. पण त्यानंतर पुन्हा पाकिस्ताननं सरशी केली.

यांचा पाठलाग करत भारतानं त्यांना 10 गोलवर गाठले आणि नंतर मागेही टाकले. त्यानंतर बरोबरी-आघाडीचा हा खेळ शेवटपर्यंत सुरू राहिला. शेवटच्या मिनिटांमध्ये भारताने 27-25 अशी आघाडी घेतली होती, पण पाकनं लागोपाठ दोन गोल करून ती भरून काढली. त्यामुळे भारतीय चाहत्यांची धडधड वाढली. भारतीय संघानं टाइमआउट घेतला आणि शेवटच्या सेकंदाला पुनियानं गोल करून विजय साकारला. मलेशियाविरुद्धच्या पहिला सामना भारतानं 45-19 असा जिंकला होता. पाकिस्तानविरुद्ध त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागला. पण सलग दुसरा सामना जिंकून त्यांनी पदकाच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button