श्रेयसच्या अर्धशतकाने दिल्ली विजयी, बंगळुरुच्या पदरात सलग सहावा पराभव

कर्णधार श्रेयस अय्यरचं धडाकेबाज अर्धशतक आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरु बुल्सवर ४ गडी राखून मात केली आहे. यासोबत बंगळुरुचा या हंगामातला हा सलग सहावा पराभव ठरला आहे. १५० धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या फलंदाजांवर अंकुश लावणं बंगळुरुच्या गोलंदाजांना जमलं नाही. स्वैर मारा आणि ढिसाळ क्षेत्ररक्षण यामुळे दिल्लीचा आजच्या सामन्यातला विजय आणखीनच सोपा झाला. श्रेयस अय्यरने ६७ धावांची खेळी केली.
सलामीवीर शिखर धवनला शून्यावर बाद करत दिल्लीने आजच्या सामन्यात आक्रमक सुरुवात केली होती. मात्र यानंतर सामन्यावर पकड घेणं त्यांना जमलंच नाही. श्रेयस अय्यरने आश्वासक खेळी करत आपला संघ संकटात सापडणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. त्याला पृथ्वी शॉ, कॉलिन इन्ग्राम आणि ऋषभ पंत यांनी छोटेखानी फटकेबाजी खेळी करत चांगली साथ दिली. बंगळुरुकडून नवदीप सैनीने २ तर मोईन अली, टीम साऊदी, मोहम्मद सिराज आणि पवन नेगी यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला.
त्याआधी, दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ घरच्या मैदानावर पुन्हा एकदा अडखळला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या दिल्ली कॅपिटल्सने बंगळुरुला १४९ धावांवर रोखलं. बंगळुरुच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी केली खरी, मात्र मोक्याच्या षटकांमध्ये धावा जमवणं त्यांना जमलं नाही. दिल्लीच्या सर्व गोलंदाजांनी बंगळुरुच्या फलंदाजांवर अंकुश लावला.
बंगळुरुच्या डावाची सुरुवात खराब झाली. पार्थिव पटेल झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्या बाजूने त्याला इतर फलंदाजांची साथ लाभली नाही. एबी डिव्हीलियर्स, मार्कस स्टॉयनिस ठराविक अंतराने माघारी परतले. यानंतर मोईन अलीच्या साथीने विराट कोहलीने फटकेबाजी करत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. मात्र कगिसो रबाडाने एकाच षटकात ३ फलंदाजांना माघारी धाडत बंगळुरुला पुन्हा धक्का दिला. अखेरीस बंगळुरुला १४९ धावांपर्यंत मजल मारला आली. दिल्लीकडून कगिसो रबाडाने ४, ख्रिस मॉरिसने २ बळी घेतले. त्यांना अक्षर पटेल आणि संदीप लामिच्छानेने १-१ बळी घेत चांगली साथ दिली.