शिवसेना उमेदवाराकडून छत्रपतींचा अवमान; शिवसेना-भाजपला किंमत मोजावी लागणार – शशिकांत शिंदे

निगडी : शिवसेनेच्या युवासेना प्रमुखांच्या उपस्थितीत साता-याच्या शिवसेना उमेदवाराने छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांचा अवमान केला आहे. महाराजांबाबत अर्वाच्च भाषेचा वापर केला. शिवसेना-भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल. छत्रपतींचा अवमान करणा-यांना महाराष्ट्रातील तरुण गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी जलसंपदा मंत्री, आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारार्थ शनिवारी निगडी, प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवासाच्या मैदानावार आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी छत्रपती उदयनराजे महाराज भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके यांच्यासह आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसांपूर्वी महायुतीची साता-याच्या कोरेगावात सभा झाली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उपस्थित होते. साता-यात उदयनराजे यांच्याविरोधात भाजपतून शिवसेनेत आलेले नरेंद्र पाटील रिंगणात आहेत. नरेंद्र पाटील यांनी तुम्ही मर्द मराठे आहात. तुमच्यात दम नसेल तर मला सांगा, मी तिकडे येतो, असे एकेरीत उल्लेख करत अर्वाच्च भाषेचा वापर केला होता.
निगडीतील सभेत साता-याच्याच शशिकांत शिंदे यांनी त्याचा समाचार घेतला. शिवसेना उमेदवाराने छत्रपती उदयनराजे महाराज भोसले यांचा अवमान केला आहे. महाराजांबाबत अर्वाच्च भाषेचा वापर केला. शिवसेना-भाजपला त्याची किंमत मोजावी लागेल. छत्रपतींचा अवमान करणा-यांना महाराष्ट्रातील तरुण गाडल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.