Views:
295
पिंपरी । प्रतिनिधी
मोदी सरकार असंवेदनशील आहे. या सरकारने कोविडचे कारण देत प्रत्येक खासदाराचा अडीच वर्षांचा निधी कापला. त्याचे आम्हाला वाईट वाटले नाही, मात्र आमच्या मतदार संघातील विकास निधी कापून स्वत:च्या नावाची पार्लमेंटची नवी इमारत ते बांधत आहेत. याचे आम्हाला वाईट वाटतं, अशी टिका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
मतदार संघातील विकास महत्वाचा की, आठशे हजार कोटींची वास्तू अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे. अंबरनाथच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. महाविकास अघाडीचे काम अत्यंत चांगले सुरु असून त्यांची चिंता करण्याची गरज नाही, असा टोलाही सुप्रीया सुळे यांनी बोलताना विरोधकांना लगावला आहे.
खासदार सुळे म्हणाल्या की, पुढे पालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्ष प्रवेश करण्यासाठी इच्छुकांची रीघ लागली आहे. मात्र केवळ भाजपमधून येणाऱ्यांचाच पक्षप्रवेश केला जाईल. महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांमधील इच्छुकांना प्रवेश दिला जाणार नसल्याचंही यावेळी बोलताना खासदार सुप्रीया सुळे यांनी आज अंबरनाथमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्पष्ट केलं. संघटनेच्या पडत्या काळात बरोबर राहिले त्यांचाच मानसन्मान केला जाईल, असे स्पष्ट करत महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारी मिळवण्याच्या अपेक्षेने राष्ट्रवादीत परतण्यास इच्छुक असलेल्यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी गर्भित इशारा दिला आहे. अंबरनाथ येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता बैठकीत सुप्रिया सुळे, मंत्री जितेंद्र आव्हाड हेदेखील उपस्थित होते .
Like this:
Like Loading...