मुझफरपूरच्या आश्रमगृहातील मुलींचे लैंगिक शोषण

पाटणा – बिहार सरकारच्यावतीने मुझफ्फरपूरमध्ये चालवण्यात येणाऱ्या आश्रमगृहामधील मुलींच्या लैंगिक शोषणाचा मुद्दा संसदेमध्ये चांगलाच गाजला. या मुलींच्या आश्रमगृहातील मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्या होण्याच्या घटनेबाबत संसदेत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. राज्य सरकारकडून शिफारस झाल्यास या घटनेचा तपास सीबीआयकडून करण्याचा विचार केला जाईल, असे केंद्र सरकारच्यावतीने सांगण्यात आले. शून्य प्रहराच्यावेळी राजद आणि कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला गेला.
मुझफ्फरपूर आश्रमगृहातील मुलींना बळजबरीने देहविक्रय व्यवसायामध्ये ढकलले जात असल्याचा आरोप कॉंग्रेस सदस्या रणजीत रंजन यांनी केला आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
राजदचे खासदार जयप्रकाश नारायण यादव यांनी लोकसभेमध्ये आणि मनोज कुमार झा यांनी राज्यसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केला. मुझफ्फरपूरमध्ये 40 निर्भयांचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप या सदस्यांनी केला. त्यावर या प्रकरणाचा तपास राज्य सरकारने यापूर्वीच सुरू केल्याचे संयुक्त जनता दलाच्या सदस्यांनी सांगितले.
हे प्रकरण गंभीर असल्याचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही म्हटले आहे. बिहार राज्य सरकारने शिफारस केल्यास या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून करण्याबाबत विचार केला जाईल, असे राजनाथ सिंह म्हणाले. राज्यसभेचे अध्यक्ष उपराष्ट्रपती एम.वेंकय्या नायडू यांनीही हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे म्हटले आहे.
काही मुलींवर बलात्कार, एकीची हत्या…
मुझफ्फरपूरमधील महिला आश्रमगृहामधील 40 पैकी निम्म्या मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. या आश्रमगृहातील कैदी महिलांपैकी एकीचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला आणि तिचा मृतदेह आश्रमगृहाच्या आवारातच पुरून टाकण्यात आला तर अन्य काही मुलींवर बलात्कार करण्यात आल्याचे काही मुलींनी पोलिसांना सांगितले आहे. या आरोपांच्या पार्श्वभुमीवर बिहार पोलिसांनी तपास सुरू केला आहे आणि आश्रमगृहाच्या आवारात खोदकामही केले आहे.