माढ्यात घासून नाही, तर ठासून येणार : राष्ट्रवादीचा दावा

सांगोला – माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे हे घासून नाही तर ठासून येणार अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी दिली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा केलेला आहे. भाजपला नकारघंटा देत राष्ट्रवादीकडून उभे राहिलेले संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी भाजपची संपूर्ण टीम माढा लोकसभा मतदारसंघात कामाला लागली आहे.
माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला सुरूंग लावण्यासाठी भाजपकडून पूर्वाश्रमीच्या संजय शिंदे यांना उमेदवारी देऊ केली होती. मात्र, संजय शिंदे यांनी अडीच वर्षे भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूनदेखील माढ्यातून भाजपची उमेदवारी नाकारली आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी स्वीकारली. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा संजय शिंदे यांच्यावर राग आहे.
संजय शिंदे यांना धडा शिकविण्यासाठी माढा लोकसभा मतदारसंघातील आघाडीतील अनेक नेत्यांना भाजपात प्रवेश दिला जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर दररोज २-३ जणांना भाजपात घेतले जात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या माढ्यात भाजपकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यावर दीपक साळुंखे यांनी भाष्य केले आहे.
भाजप माढ्यात दबाव टाकून नेते, पदाधिका-यांचा पक्षप्रवेश करून घेत आहे. मात्र, नेते गेले तरी जनता आमच्यासोबतच राहणार आहे हे स्पष्ट आहे. त्यामुळे तुम्ही कितीही नेते नेले तरी जनतेच्या जीवावर माढ्यात राष्ट्रवादी घासून नाही तर ठासून येणार आहे असा विश्वास साळुंखे यांनी व्यक्त केला आहे.