breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महिलेवरील गोळीबार प्रकरणी अॅड सुशील मंचरकर विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी – हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनी वसाहतीमध्ये एका महिलेवर झालेल्या गोळीबार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका गीता मंचरकर यांचे पती अॅड. सुशील मंचरकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिलेने मंचरकर विरोधात यापूर्वी दिलेली तक्रार परत घेण्यासाठी महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात आले आहे.
शितल फिलिप सिकंदर (वय 35, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या फिर्यादी महिलेचे नाव आहे. एच ए वसाहतीच्या आवारात शीतल मुलगा दहावी पास झाला म्हणून पेढे घेण्यासाठी आल्या होत्या, त्यावेळी त्यांच्यावर अज्ञात दोघांनी गोळीबार केला. या घटनेत त्या बचावल्या. मात्र आपल्यावर गोळी झाडली गेली असल्याने त्या घाबरल्या आणि बेशुद्ध झाल्या. त्यानंतर शीतल शुद्धीवर आल्यावर पिंपरी पोलिसांनी त्यांची फिर्याद घेतली. त्यावेळी त्यांनी हा खुलासा केला.
2014 साली शीतल यांनी मंचरकर विरोधात एक तक्रार दिली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी मंचरकर याने त्याच्या दोन साथीदारांच्या साहाय्याने शीतल यांच्यावर गोळीबार केला. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाण्यात सुशील मंचरकर आणि अन्य दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीसुशील मंचरकर याच्यावर माजी विरोधी पक्षनेते कैलास कदम यांच्या हत्येचा कट आणि मोक्का अंतर्गत कारवाई सुरु आहे. जेलमधून सराईत आरोपींना पोलीस संरक्षणातून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे.