देशातील शेती उत्पादनाबाबत कृषिमंत्री राधामोहन सिंग म्हणाले…

पटना : केंद्र सरकारच्या विविध धोरणांमुळेच गेल्या ४ वर्षांमध्ये देशातील कृषी उत्पादन २ कोटी टनांनी वाढले आहे, असा दावा केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी केला आहे. दरम्यान, यंदाही यामध्ये या उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ होईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
बिहारची राजधानी पटना येथे आयोजित एका कार्यक्रमादरम्यान कृषिमंत्री बोलत होते. सन २०१० ते २०१४ या चार वर्षांच्या कालावधीमध्ये देशाचे सरासरी कृषी उत्पादन हे एकूण २५ कोटी ५० लाख टन इतके होते. परंतु मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर या उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. २०१७-१८ या एकाच वर्षामध्ये हे प्रमाण २८ कोटी टनांवर पोहोचले आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सामान्य शेतकऱ्यांना सर्वाधिक फायद्याची आहे. यामुळे प्रत्येक वर्षी शेती करणाऱ्या शेतकऱ्याची शेती ही पूर्णपणे सुरक्षित झाली आहे, असे कृषिमंत्री म्हणाले.