…तर राम मंदिराचा अध्यादेश काढून दाखवा- खासदार असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली- एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा बोलताना केंद्र सरकारला आव्हान दिले आहे. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी मोदी सरकार अध्यादेश का काढत नाही, प्रत्येक वेळी ते अध्यादेश काढण्याची धमकी देतात. तुमच्याकडे सत्ता आहे. मी तुम्हाला आव्हान देतो की, अध्यादेश काढून दाखवा, असे ओवैसी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरच्या मुद्द्यावर भाष्य केलं होतं. त्यावरही ओवैसींनी टीका केली होती. तसेच, काही दिवसांपूर्वीही ओवैसी यांनी राम मंदिरावर टिपण्णी करताना म्हटले होते की, राम मंदिर बांधण्यापासून सरकारला कोणीही अडवत नाही. त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधून दाखवावे. भाजपाला देशात धार्मिक विविधता नको, त्यांना उदारमतवाद नको. भाजपाला देशात एकाधिकारशाही राबवयाची आहे. त्या पक्षाचा विविधता आणि कायद्यावर विश्वास नाही, असेही यावेळी ओवैसी म्हणाले होते.