Mahaenews

डॉ. हेडगेवार यांच्या स्मृती मंदिराला पर्यटनस्थळाचा दर्जा

Share On

नागपूर – महाराष्ट्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपुरातील स्मारकाला पर्यटनस्थळाचा दर्जा दिला आहे. हेडगेवार यांचे स्मारक स्मृती मंदिर म्हणून ओळखले जाते. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच जारी केली आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने या स्मारकाला पर्यटनाचा दर्जा देण्याची शिफारस केली होती. ती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली. रेशीमबागेतील स्मृती मंदिराला पर्यटन स्थळाचा दर्जा द्यावा, अशी मागणी नागपूर भाजपचे उपाध्यक्ष भुषण दावडे यांनी गतवर्षी केली होती. या मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता.
डॉ. हेडगेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. डॉ. हेडगेवार यांचे 21 जून 1940 रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रेशीमबाग येथून सुरु झाली होती. त्यामुळे रेशीमबाग हे संघ स्वयंसेवकांसाठी पूजनीय आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालयही नागपुरात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने स्मृती मंदिराचा “नागपूर दर्शन’ यादीत समावेश केला आहे. यापूर्वी नागपूर महापालिकेने स्मृती भवन आणि बाळासाहेब देवरस पथ त्रिवेणी स्मारक, गांधीबागाच्या विकासकामांसाठी 3 कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Exit mobile version