breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘जे.जे.’त हृदयावरील ‘एट्रियल अ‍ॅपेंडेज’

राज्यातील सार्वजनिक रुग्णालयांमधील चौथी शस्त्रक्रिया

हृदयविकारावरील उपचारांत नवीन तंत्रज्ञान सातत्याने विकसित होत आहे. हृदयविकाराच्या ज्या रुग्णांना पक्षाघाताचा त्रास उद्भवतो त्यांच्यासाठी गेल्या काही वर्षांत ‘एट्रियल अ‍ॅपेंडेज क्लोज’ ही शस्त्रक्रिया वरदान ठरली आहे. जे.जे. रुग्णालयात साठीतील वत्सलाबाईंवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. जे.जे. रुग्णालयात अशा प्रकारच्या आजारावरील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून महाराष्ट्राच्या सार्वजनिक रुग्णालयांमधील ही चौथी शस्त्रक्रिया आहे.

हृदयविकारतज्ज्ञ डॉ. नागेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या पथकाने केलेल्या या शस्त्रक्रियेमुळे वत्सलाबाईंचा पक्षाघाताचा धोका नव्वद टक्के कमी झाला आहे.

जे.जे. रुग्णालयातील हृदयविकार विभागात गेल्या शनिवारी दाखल झालेल्या वत्सलाबाईंवर यापूर्वीच अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आला होता. जे.जे. रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांच्या हृदयाचे ठोके अनियमित झाले होते. हृदयामधील डाव्या कप्प्यात रक्तामध्ये गुठळी तयार होऊन मेंदूकडे जाणाऱ्या रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होऊन पक्षाघाताचा पुन्हा झटका येण्याची शक्यता होती. हे टाळण्यासाठी एट्रियल अ‍ॅपेंडेज क्लोज शस्त्रक्रिया करणे गरजेचे होते. मानद अध्यापक डॉ. अनिल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नागेश यांनी तात्काळ ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार वत्सलाबाईंच्या पायातील नसेमधून कॅथेटर (वायर) टाकून हृदयाच्या डाव्या कप्प्यात अ‍ॅम्पाक्झर कार्डियॅक प्लग टाकून बंद केला. यामुळे हृदयातील डाव्या कप्प्यात रक्ताची गुठळी होण्याचे थांबले. जे.जे. रुग्णालयातील ही शस्त्रक्रिया भारतीय डॉक्टरांनी केल्याचे डॉ. नागेश वाघमारे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधीमधून पैसे उपलब्ध करून दिले.

शस्त्रक्रियेचे वैशिष्टय़

अ‍ॅट्रियल फॅब्रिलेशनमध्ये हृदयाचे ठोके अनियमित होतात. ते नियमित व्हावे यासाठी वॉर्फ नावाचे औषध दिले जाते. तथापि अनेक रुग्णांना हे औषध पचनी न पडून पोटात रक्तस्राव होतो. परिणामी हे औषध घेणे अशा रुग्णांसाठी धोकादायक असते. या रुग्णांना पक्षाघाताचा धोका अधिक असून त्यावर ‘एट्रियल अ‍ॅपेंडेज क्लोज’ ही प्रभावी उपाययोजना आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button