जेईई अॅडव्हान्स्डचा निकाल फक्त ११.६९ टक्केच !

नवी दिल्ली : इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) व नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. केवळ ११.६९ टक्के विद्यार्थी पास झाले असून, त्यात हरयाणातल्या पंचकुल येथील प्रणव गोयल हा देशातून पहिला आला आहे. त्याला ३६० पैैकी ३३७ गुण मिळाले आहेत. तर मुलींमध्ये कोटा येथील मीनल पारेख ही पहिली आली असून, तिला ३१८ गुण मिळाले आहेत.
या परीक्षेत दुसरा क्रमांक कोटा येथील साहिल जैैन व तिसरा क्रमांक दिल्लीच्या कैलाश गुप्ता याने पटकाविला आहे. देशभरातील २३ आयआयटी व एनआयटीच्या प्रवेशांसाठी ही परीक्षा २० मे रोजी आॅनलाइन घेण्यात आली होती. देशभरातून या परीक्षेला बसलेल्या १,५५,१५८ मुलांपैैकी १८ हजार १३८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
या परीक्षेत एकूण १६,०६२ विद्यार्थी व २०७६ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. सर्वसाधारण गटातील ८७९४, अन्य मागासवर्गीय गटातून ३१४०, अनुसूचित जातींमधून ४७०९, अनुसूचित जमाती गटामधून १४९५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.