घरांना पडल्या भेगा…पहिल्या पावसातच माळीणकरांना स्थलांतराचा धोका!

तीन वर्षांपूर्वी दरडीखाली गाडले गेलेले माळीण गाव नव्याने वसवले. परंतु, पहिल्याच पावसात माळीणची बिकट अवस्था झाली आहे. गावातील अनेक रस्ते खचले आहेत. घरांच्या भिंतींनाही मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थ स्थलांतर करण्याच्या मनस्थितीत आहेत.पुणे जिल्ह्यातील माळीण गाव 30 जुलै 2014 रोजी होत्याचे नव्हते झाले. दरड कोसळल्याने संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले होते. या दुर्घटनेने अनेकांना सुन्न करून सोडले होते. साखरझोपेत असताना संपूर्ण गाव मातीखाली गेले होते. या दुर्घटनेत 151 जणांचा बळी गेला, तर काहींचे संपूर्ण कुटुंब मातीखाली गाडले गेले होते.
या प्रकोपातून वाचलेली अनेक मंडळी निराधार झाली होती. त्यांना आधाराचा हात देण्यासाठी प्रशासन, सरकार पुढे सरसावल आणि 2 एप्रिल रोजी सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या पुनर्वसित माळीण गावाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते.नवी घरे, शाळा, मंदिर, रस्ते असे गावाचे लोभसवाणे रूप पाहून सगळेच हरखले होते. पण काल रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने या गावाची अवस्था बिकट झाल्याचे पाहायला मिळत आहे. माळीण गावातील रस्ते खचले आहेत. तर, अनेक ठिकाणी भिंतींना मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे गावकरीही हादरलेत. काही जण तर गाव सोडण्याचाही विचार करताहेत.