Uncategorized

कुलगुरू निवडीत कोणताही हस्तक्षेप होणार नाही: डॉ. अनिल काकोडकर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीमध्ये कुठलाही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, असे मत पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू शोध समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी आज येथे व्यक्त केले. त्यामुळे कुलगुरू निवडप्रक्रिया “पारदर्शकता’ होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
पुण्यात रविवारी एका कार्यक्रमासाठी डॉ. काकोडकर पुण्यात आले होते. त्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. राज्यपालांनी पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू निवडीसाठी तीन सदस्यीय शोध समिती नेमली आहे. त्या समितीचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर आहेत. या समितीत जयपूर येथील मालवीय राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक डॉ. उदयकुमार यारगट्टी आणि सिडकोचे उपाध्यक्ष भूषण गगराणी यांचा समावेश आहे. त्यानंतर नवीन कुलगुरू निवडीची प्रक्रिया सुरू झाली.
सध्या नवीन कुलगुरू निवडीसाठी विशिष्ट उमेदवारांची निवड होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच केंद्र व राज्यात भाजपची सत्ता आहे. या पक्षाच्या विचारसरणीच्या उमेदवाराची निवड कुलगुरू पदावर होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे कुलगुरू निवडीवरून राजकीय हस्तक्षेप होणार, असा तर्क बांधला जात आहे. त्या पार्श्‍वभूमीवर शोध समितीचे अध्यक्ष डॉ. काकोडकर यांच्या कुलगुरू निवड प्रक्रियेत कुठलाही हस्तक्षेप होणार नसल्याच्या वक्‍तव्याला अधिक महत्त्व प्राप्त होत आहे. तसेच शोध समितीकडे कुलगुरू पदासाठी किती अर्ज आले आहेत, त्याविषयी अधिक भाष्य करण्याचे टाळले.
डॉ. भूषण पटवर्धन यांचे नाव चर्चेत
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी राज्य व देशातील तज्ज्ञांनी अर्ज केले आहेत. मात्र त्यात पुणे विद्यापीठातील कुलसचिव, परीक्षा नियंत्रकापासून विभागप्रमुखही आघाडीवर आहेत. या अर्जाची छाननी करून, त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. या अर्जात पुणे विद्यापीठाच्या आरोग्यशास्त्र विभागाचे डॉ. भूषण पटवर्धन यांचा बायोडाटा सर्वात सरस आहे. त्यामुळे सध्या तरी कुलगुरूपदासाठी त्यांचे नाव सर्वात पहिले घेतले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button