कर्नाटकमध्ये मंत्रिमंडळात 25 मंत्र्यांचा समावेश

बेंगळूरु – कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. शपथविधीनंतर तब्बल 15 दिवसांनी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 25 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला. त्यामध्ये 15 जण कॉंग्रेसचे, 9 सत्ताधारी धर्मनिरपेक्ष जनता दलाचे तर बसपा आणि केपीजेपी यांच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे.
राजभवनामध्ये आयोजित समारंभात राज्यपाल विजुभाई वाला यांनी या मंत्र्यांना पद आणिगोपनीयतेची शपथ दिली.
या मंत्रिमंडळामध्ये माजी पंतप्रधान आणि जेडीएसचे सर्वेसर्वा एच.डी. देवेगौडा यांचे चिरंजीव एच.डी रेवण्णा आणि राज्यातील कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांचाही समावेश आहे. कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातील पराभवास कारणीभूत झालेले धर्मनिरपेक्ष जनता दलाचे जी.टी. देवेगौडा यांनाही मंत्रिमंडळात समाविष्ट करण्यात आले आहे.
विधानपरिषदेतील कॉंग्रेसचे आमदार जयमाला या एकमेव महिला मंत्री आहेत.
सत्ता वाटपाच्या अलिखीत करारानुसार कॉंग्रेसचे 22 आणि जेडीएसचे 12 मंत्री असणार आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे कर्नाटकातील एकूण मंत्र्यांची संख्या 27 झाली आहे. अजून 7 मंत्रीपदे रिक्त आहेत. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.