एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे

- दिवाकर रावते यांच्या सोबत झालेल्या बैठकित तोडगा
मुंबई – दोन दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा अघोषित संप अखेर मागे घेण्यात आला. परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी झालेल्या एसटी कामगार संघटनांच्या बैठकीनंतर हा संप मागे घेतल्याची घोषणा करण्यात आली. यामुळे राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दिवाकर रावते यांनी विविध एसटी कर्मचारी संघटनांसमवेत त्यांच्या मागण्यांबाबत चर्चा केली. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल, कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हनुमंत ताटे, कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, इंटकचे मुकेश तिगोटे, कास्ट्राईब संघटनेचे श्री. निरभवणे, इंटकचे श्रीरंग बरगे आदी उपस्थित होते.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचा दोन दिवस सुरु असलेल्या या संपाचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, या जिल्ह्यांना बसला. तुलनेने मराठवाडा आणि विदर्भात 40 टक्के वाहतूक सुरू होती. दिवसभरात महाराष्ट्रातील 250 आगारांतून बसच्या सुमारे 20 टक्के फेऱ्या झाल्या. या संपाला काही ठिकाणी हिंसक वळणही लागले. या हिंसक वळणात शिवशाही बसलाच लक्ष्य केल्याचे दिसून आले. गेल्या 48 तासांत राज्याच्या विविध भागात 19 शिवशाही बस फोडण्यात आल्या आहेत.