उत्पन्नाची अट शिथिल केल्याने आरटीई प्रवेशास पुन्हा संधी

पिंपरी – राज्य सरकारने आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल करीत उत्पन्नाची अट शिथिल केल्यामुळे यापूर्वी अर्ज न भरलेल्या पालकांना नव्याने अर्ज भरण्याची संधी मिळाली आहे. मात्र पहिल्या फेरीनंतर जे पालक दुसऱ्या फेरीच्या प्रतीक्षेत आहेत, ते आता अडचणीत सापडले आहेत. शाळा दहा दिवसांत सुरू होणार असताना पहिलीत प्रवेश घेणाऱ्या पाल्यांसाठी पालकांची आता धावपळ सुरू झाली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत येत्या शैक्षणिक वर्षासाठीचे २५ टक्के आरक्षण जागांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया २४ जानेवारीपासून सुरू झाली. आरटीईच्या प्रवेशासाठी ३ जानेवारीपासून शाळा नोंदणी सुरू झाली होती. मात्र शाळा नोंदणीस अल्प प्रतिसाद मिळाला. काही शाळांनी परताव्यासाठी कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सरकारनेच आपल्या पद्धतीने शाळांची नोंदणी करून घेतली. कोर्टाचा निकाल लांबल्यामुळे पहिल्या फेरीत आरटीईचे प्रवेश रखडले. कोर्टाने शाळांना प्रवेश देणे बंधनकारक असल्याचा निर्णय दिल्यानंतर शाळांनी आरटीईचे प्रवेश करून घेतले.
गेल्या पाच महिन्यांत केवळ पहिलीच फेरी पूर्ण झाली आहे. सातत्याने मुदतवाढ दिल्यामुळे या वर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेत दिरंगाई झाली. शाळा व प्रशासनाकडून अनेक कारणांमुळे प्रवेशास अडथळा आणला जात असल्यामुळे पालक हैराण झाले आहेत. जून उजाडला तरी दुसरी फेरी सुरू न झाल्याने पालक चिंतेत आहेत.
नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. तरीही येत्या शुक्रवारपर्यंत दुसरी फेरी सुरू करण्याचा प्रयत्न करू. पुढील फेऱ्याही वेळेत होतील, याची काळजी घेतली जाईल.
– हारून अत्तार, शिक्षणाधिकारी, पुणे विभाग