आदर्श आचार संहितेचा विकास कामांना अडसर, विलास मडिगेरी म्हणतात…

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – लोकसभा निवडणूक आचार संहिता शिथिल करून पिंपरी-चिंचवडमधील विकास कामांसंदर्भात निर्णय घेण्यास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे केली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी 10 मार्च 2019 रोजी पासून आचारसंहिता लागू झाली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील विकास कामांना आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला आहे. पर्यायाने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात विकास कामे, कल्याणकारी योजना, महत्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लावण्यास निर्बंध आले आहेत. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मतमोजणी होईपर्यंत निवडणुकीशी संबंधित अधिका-यांना आढावा बैठका घेणे, विकास कामांना मान्यता देण्यासंबंधित निर्णय घेण्यास प्रतिबंध घातले आहेत.
महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकात नमूद विकास कामे व त्या अनुषंगाने निविदा मागविणे, निविदा उघडणे, निविदा मंजूर करणे, करारनामा करणे, काम सुरू करण्याचे आदेश देणे, अंदाजपत्रकातील कामांना प्रशासकीय व आर्थिक मान्यता देणे, देखभाल दुरूस्तीची कामे, कार्यालयीन कामकाजाची स्टेशनरी व साधन सामग्री खरेदी करण्यास आचारसंहितेमुळे बंधणे आली आहेत. आचारसंहिता शिथिल केल्यास ही कामे मार्गी लावून विकासाला गती देता येईल. त्यासाठी आचार संहिता शिथिल करण्याची मागणी मडिगेरी यांनी केली आहे.