breaking-newsक्रिडा

विम्बल्डन टेनिस स्पर्धा: शारापोव्हा, क्‍विटोव्हा सलामीलाच पराभूत

गार्सिया, पावलुचेन्कोव्हा यांनाही सलामीला धक्‍का
लंडन: एका बाजूला माजी विजेता राफेल नदाल, चतुर्थ मानांकित अलेक्‍झांडर झ्वेरेव्ह व पाचवा मानांकित युआन मार्टिन डेल पोट्रो, तसेच महिला एकेरीतील अग्रमानांकित सिमोना हालेप व तृतीय मानांकित गार्बिन मुगुरुझा विजयी सलामी देत असताना मारिया शारापोव्हा आणि पेट्रा क्‍विटोव्हा या माजी विजेत्यांसह सहाव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाला मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्‍का बसल्यामुळे विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा दुसरा दिवस गाजला.
नदालने इस्रायलच्या डुडी सेलावर 6-3, 6-3, 6-2 असा विजय मिळवीत मानांकन यादीत अव्वल 100 क्रमांकांमध्ये नसलेल्या खेळाडूंकडून पराभवाची मालिका खंडित केली. विम्बल्डनमध्ये गेल्या सहापैकी चार वेळा नदालवर ही नामुष्की आली होती. डेल पोट्रोने जर्मनीच्या पीटर गोजोवझिकचा 6-3, 6-4, 6-3 असा पराभ” केला. तर झ्वेरेव्हने जेम्स डकवर्थचा 7-5, 6-2, 6-0 असा धुव्वा उडविला.

महिला एकेरीत हालेपने जपानच्या कुरुमी नाराचा 6-2, 6-4 असा फडशा पाडला. तर मुगुरुझाने नाओमी ब्रॉडीची झुंज 6-2, 7-5 अशी मोडून काढली. परंतु उत्तेजक सेवनाच्या बंदीतून परतलेल्या मारिया शारापोव्हाला रशियाची पात्रतावीर व्हिटालिया दियातचेन्कोकडून तीन सेटच्या प्रदीर्घ झुंजीनंतर 6-7, 7-6, 6-3 असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पहिला सेट 7-6 असा जिंकल्यावर शारापोव्हा दुसऱ्या सेटमध्ये 5-2 अशी आघाडीवर होती. परंतु दियातचेन्कोने शारापोव्हाच्या नाहक चुकांचे माप तिच्या पदरात घालताना सनसनाटी विजयाची नोंद केली.

महिला एकेरीतील पहिल्या फेरीच्या आणखी एका सामन्यातही बेलारूसची षोडशवर्षीय टेनिसपटू अलेक्‍झांड्रा सॅस्नोविचने माजी विजेत्या पेट्रा क्‍विटोव्हाचे आव्हान तीन सेटच्या लढतीनंतर संपुष्टात आणताना खळबळजनक निकालाची नोंद केली. सॅस्नोविचने पेट्रा क्‍विटोव्हाची झुंज 6-4, 4-6, 6-0 अशी मोडून काढताना विम्बल्डनच्या इतिहासातील आणखी अविश्‍वसनीय विजयाचे श्रेय मिळविले.

स्वित्झर्लंडची बेलिन्डा बेन्किक आणि तैपेई चीनची सु वेई हसिह यांनीही मानांकित खेळाडूंवर मात करताना धक्‍कादायक विजयासह महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. बिगरमानांकित बेलिन्डा बेन्किकने सहाव्या मानांकित कॅरोलिन गार्सियाला 7-6, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. तसेच सु वेई हसिहने तिसाव्या मानांकित ऍनेस्तेशिया पावलुचेन्कोव्हावर 6-4, 4-6, 6-3 असा विजय मिळविताना दुसऱ्या फेरीत धडक मारली.

व्हीनस विल्यम्सचा विक्रम

माजी विजेत्या व्हीनस विल्यम्सने पहिल्या फेरीत विजयाची नोंद करताना आपल्या देदीप्यमान कारकिर्दीतील आणखी एका विक्रमाची नोंद केली. व्हीनसने तब्बल 79व्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये खेळण्याचा बहुमान मिळविताना आगळा विश्‍वविक्रम प्रस्थापति केला आहे. दुसऱ्या क्रमांकावरील ऍमी फ्रेझियरपेक्षा (71) ती खूपच पुढे आहे. फ्रॅन्सेस्का शिव्हॉन (70), सेरेना विल्यम्स (68) आणि मार्टिना नवरातिलोव्हा (67) या खेळाडू त्यानंतरच्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या फेरीत व्हीनससमोर रुमानियाच्या अलेक्‍झांड्रा डल्गेरूचे आव्हान आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button