breaking-newsक्रिडा

मेक्‍सिकोवर वर्चस्वासाठी जर्मनी सज्ज

  • पहिल्याच सामन्यात छाप पाडण्यासाठी गतविजेत्यांचा प्रयत्न 

मॉस्को – विविध कारणांमुळे उभ्या राहिलेल्या वादविवादामुळे जर्मनीला विश्‍वचषक स्पर्धेची पूर्वतयारी मनासारखी करता आली नाही. त्यामुळे अद्यापही आत्मविश्‍वासाच्या शोधात असलेल्या गतविजेत्या जर्मनीची फिफा विश्‍वचषक स्पर्धेतील आज (रविवार) रंगणाऱ्या पहिल्याच साखळी लढतीत अनुभवी मेक्‍सिकोविरुद्ध कसोटी लागणार आहे. अर्थात मेक्‍सिकोचा संघही स्पर्धेपूर्वी निरोपसमारंभातील पार्टीमुळे वादात सापडला आहे.

तरीही जर्मनीसमोरची आव्हाने अधिक खडतर आहेत. मॅन्युएल न्यूएर जवळजवळ आठ महिन्यांसाठी दुखापतीमुळे बाहेर राहिल्यानंतर जेमतेम विश्‍वचषक तोंडावर असताना तंदुरुस्ती झाला आहे. त्यामुळे त्याच्याकडून सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा जर्मनीला करता येणार नाही. तसेच मेस्यूट ओझिल आणि इल्के गुंडोगॅन यांना काही दिवसांपूर्वी झालेल्या मित्रत्याच्या लढतीदरम्यान तुर्की राष्ट्राध्यक्ष रेकॅप एर्डोगॅन यांच्यासोबत छायाचित्रे काढल्याबद्दल जर्मनीच्या चाहत्यांनी त्यांची हुर्रे उडविली होती.

त्यातच पात्रता फेरीतील जर्मनीची कामगिरी गतविजेत्यांना साजेशी नव्हती. सौदी अरेबियावरील 5-0 असा विजय ही त्यांच्या लौकिकाला साजेसी एकमेव कामगिरी ठरली. परंतु या सर्व वादांचा जर्मन खेळाडूंनी आपल्यावर परिणाम होऊ देता कामा नये, असे मत जर्मन मध्यरक्षक टोनी क्रूसने व्यक्‍त केले आहे. आम्ही येथे फुटबॉल खेळण्यासाठी आलो आहोत. बाकी सर्व गोष्टी फजूल आहेत, असे त्याने आपल्या सहकाऱ्यांनाही बजावले आहे.

विजयासाठी आवश्‍यक असलेली आग हृदयात असणे आवश्‍यक आहे. आम्हाला सातत्याने गोल करण्याची तीव्र इच्छा मनात पाहिजे, असे सांगून जर्मनचा बचावपटू जेरोम बोटेंग म्हणाला की, आपल्याला सामने सोपे जातील अशा गैरसमजात राहिल्यास काहीच साधणार नाही. उलट प्रत्येक सामन्यात आम्हाला सर्वस्व पणाला लावण्याची गरज आहे. कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाला कमी लेखणे आम्हाला परवडणार नाही.

मेक्‍सिकोला भोवली निरोपाची पार्टी 
फिफा विश्‍वचषक स्पर्धेसाठी मेक्‍सिकोच्या अनुभवी संघाने तयारी तर चांगलीच केली होती. परंतु युरोपमधून रशियाला रवाना होण्यापूर्वी झालेल्या निरोपसमारंभानंतर रात्री झालेल्या खास पार्टीत त्यातील अनेक खेळाडूंनी सुमारे 30 वेश्‍यांसोबत मौजमजा केल्याचे उघड झाल्याने हे खेळाडू वादाच्या भोवऱ्यात सापडले. परंतु या खेळाडूंनी मोकळ्या वेळात या पार्टीला हजेरी लावल्यामुळे त्यांना कोणतीही शिक्षा करण्यास मेक्‍सिकोच्या अधिकाऱ्यांनी साफ नकार दिला. परंतु त्याआधी या महिन्याच्या प्रारंभी स्कॉटलंडविरुद्धच्या सराव सामन्यातील विजयानंतरही मेक्‍सिकोच्या 9 खेळाडूंनी काही सौंदर्यवती महिलांसोबत धमाल केल्याचे वृत्त अद्याप ताजेच होते. त्यामुळे या सगळ्या उद्योगांवर पडदा टाकण्यासाठी मेक्‍सिकोच्या खेळाडूंना विश्‍वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी करावी लागेल.

जर्मनी – मॅन्युएल न्यूएर, मेस्यूट ओझिल, इल्के गुंडोगॅन अन्य प्रमुख खेळाडू
मेक्‍सिको- मार्को फॅबियन, राऊल, जेव्हियर हर्नांडेझ व आन्द्रेस ग्वार्दादो.
मेक्‍सिकोचा राफेल मार्क्‍वेझ पाच विश्‍वचषक खेळणारा केवळ तिसरा खेळाडू ठरेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button