breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

‘मरे’ची रडकथा सुरूच!

तीन एक्स्प्रेसची रखडपट्टी, रूळ ओलांडताना अपघात व फाटक सुरूच राहिल्याने लोकलसेवा विस्कळी

गेल्या काही महिन्यांपासून विस्कळीत होणारी मध्य रेल्वे गुरुवारीही तीन विविध कारणांनी रखडली. मुंबईकडे येणाऱ्या तीन एक्स्प्रेसच्या आगमनास झालेला विलंब, डोंबिवली स्थानकाजवळ रूळ ओलांडताना झालेला अपघात व दिवा स्थानकातील रेल्वे फाटक बराच वेळ सुरूच राहिल्याचे निमित्त या तीन कारणांमुळे लोकलसेवेचे वेळापत्रक पुरते कोलमडले.

या गोंधळामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद व धिम्या लोकल गाडय़ांचा वेग मंदावला. सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झालेले हाल दुपारी तीन वाजेपर्यंत कायम होते.

सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली स्थानकाजवळ रूळ ओलांडताना एका व्यक्तीला सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलची धडक बसली. या व्यक्तीला त्वरित जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी नेण्यात आले. यादरम्यान लोकल पंधरा मिनिटे थांबवून ठेवण्यात आली. त्यामुळे मागून येणाऱ्या दोन लोकलही रखडल्या. परिणामी सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावू लागल्या. ही परिस्थिती सुधारेल असे वाटत असतानाच काही वेळातच दिवा स्थानकातील फाटक हे सकाळी ९ च्या सुमारास स्थानिक वाहतुकीसाठी पंधरा मिनिटांपेक्षा बराच वेळ सुरू ठेवावे लागले. त्यात धिम्या व जलद लोकल गाडय़ांचे वेळापत्रक पुन्हा कोलमडले.

या दोन कारणांमुळे लोकल वेळापत्रकाचे तीनतेरा वाजले असताना सकाळपासून रखडलेल्या एलटीटी, सीएसएमटीकडे जाणाऱ्या तीन एक्स्प्रेस गाडय़ांना मार्ग करून देण्यासाठी जलद लोकल गाडय़ांना थांबविण्यात आले. तीन एक्स्प्रेस गाडय़ांना मार्ग करून देण्यासाठी कल्याण-डोंबिवलीनंतर जलद लोकल गाडय़ांना धिम्या मार्गावर वळवण्यात आले. सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या व जलद लोकल एकाच मार्गावरून जात असल्याने लोकल उशिराने धावू लागल्या. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागला.

कल्याणसह, डोंबिवली, ठाणे व अन्य काही जलद मार्गावरील स्थानकांत लोकल तांत्रिक कारणास्तव उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होत होती; परंतु त्यामागील नेमके कारण सांगितले जात नसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण होते. दुपारी दोन वाजेपर्यंत ही परिस्थिती कायम होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button