breaking-newsमहाराष्ट्र

भाजपाने नथुराम गोडसे, गोळवलकरांना सोडावे, मग गांधींना मिठी मारावी: सबनीस

भाजपाने नथुराम गोडसे, गोळवलकर यांना सोडावे आणि मगच महात्मा गांधी यांना मिठी मारावी, अशा शब्दात माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भाजपाला फटकारले. सद्य परिस्थितीत आंबेडकर यांना भगवे आणि हिरवे करण्याचे काम सुरू असले तरी आंबेडकरांचा निळा रंग टिकून ठेवला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

चेतक बुक्स प्रकाशित डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा कादंबरीचे इहवादी मूल्यमापन आणि आंबेडकरवादी प्रतिभावंत या दोन्ही ग्रंथाचे प्रकाशन सोमवारी शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, श्रीपाल सबनीस आणि राज्यसभा खासदार वंदना चव्हाण तसेच आदी मान्यवर उपस्थित होते. शरद पवार म्हणाले, हा सोहळा बालगंधर्व रंगमंदिरात होतोय याचा आनंद आहे. हा सोहळा जर अण्णाभाऊ साठे सभागृहात झाला असता तर वेगळा रंग लागला असता. कष्टकरी लोकांची बाजू मांडायची असेल तर आपल्याला डाव्या विचारसरणीचा पुरस्कार केला पाहिजे हीच शिकवण अण्णाभाऊ साठे यांनी दिली. अण्णाभाऊ साठे यांची फकारी ही कादंबरी मराठीमध्ये सर्वात गाजलेलं साहित्य असून त्यातून अण्णाभाऊंनी त्यांचं जीवन दाखवले आहे. त्यांच्या साहित्यात सर्व सामान्य कष्टकरी व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवल्याचे दिसते. त्यांनी त्यातून अन्याय अत्याचार साहित्य मांडल्याचे पवार यांनी सांगितले.

तर सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटले की, माझ्यावर खरच अन्याय झाला. मला आज गुरू नंतर भाषण करावं लागतंय. शरद पवार माझे गुरू आहेत. शरद पवार यांनी देशात आणि राज्यात पुरोगामित्वाचा खूप मोठा प्रयोग अस्तित्वात आणला. शरद पवारांनी अनेक उपेक्षित लोकांना संधी देत त्यांना आमदार, खासदार केले. आता सर्वंकष दलित चळवळ उभी राहिली पाहिजे. ज्यामध्ये सर्व दलित जाती एक येतील. आताच्या पिढीला अण्णाभाऊ साठेचे साहित्य दिशा देणारे असून एका गावापासून मुंबई पर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण होता. या त्याच्या साहित्याने समाजात एका वेगळा उमठवल्याचे त्यांनी नमूद केले.

श्रीपाल सबनीस यांनी भाषणादरम्यान भाजपाला चिमटे काढले. भाजपाने गांधी यांना जरूर पकडावे, पण त्यांनी आधी गोळवलकर आणि नथुराम गोडसेला सोडले पाहिजे. मगच भाजपाने गांधींना मिठी मारावी, असा चिमटा त्यांनी काढला. आजच्या परिस्थितीत आंबेडकर यांना भगवे आणि हिरवे करण्याच काम सुरू आहे. मात्र आंबेडकरांचा निळा रंग टिकून ठेवला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button