IND vs SL फायनल सामना पावसामुळे रद्द झाला तर कसा ठरणार विजेता? वाचा सविस्तर..

IND vs SL : आशिया चषक २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात होणार आहे. हा सामना रविवारी १७ सप्टेंबर रोजी आरके प्रेमदासा स्टेडियम कोलंबोयेथे होणार आहे. मात्र या अंतिम सामन्यातही पावसाची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर पावसामुळे वाया गेला तर आशिया चषक ट्रॉफी कोणाला मिळणार? याबाबत जाणून घ्या…
हवामानाच्या अंदाजानुसार, १७ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र, थांबून-थांबून पाऊस होण्याची शक्यता आहे. ८० टक्के पाऊस पडण्याची शक्यता असून वारेही ताशी १८ किमी वेगाने वाहण्याची शक्यत आहे. अशा परिस्थितीत फायनलच्या दिवशी पाऊस पूर्णपणे अडथळा निर्माण करणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे या सामन्यासाठी राखीव दिवसाचे आयोजन केले आहे.
हेही वाचा – Nipah Virus आला महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर? कर्नाटकने जारी केला अलर्ट
१७ सप्टेंबरला पावसामुळे सामना वाया गेला, तर दुसऱ्या दिवशी सामना खेळवला जाईल. म्हणजेच अंतिम फेरीसाठी एक दिवस राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. अशा स्थितीत १८ सप्टेंबरलाही पाऊस पडेल का? हा प्रश्नही चाहत्यांच्या मनात आहे. १८ सप्टेंबर म्हणजेच राखीव दिवशीही पावसाची शक्यता ६९% आहे. अशा परिस्थितीत १७ आणि १८ तारखेला पाऊस पडला आणि सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर दोन्ही संघांना संयुक्त विजेता घोषित केले जाईल.