उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी वर्षा गायकवाड यांची समितीवर वर्णी
नवी दिल्ली – पुढील वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्याच पार्श्ववभूमीवर काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभेसाठी स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीवर महाराष्ट्रातून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.एकेकाळी उत्तर प्रदेशच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र गेली अनेक वर्षे काँगेस येथील सत्तेपासून दूर आहे. काँग्रेस पक्ष अस्तित्वाची लढाई लढत आहे. त्यामुळे पुढील निवडणुकीसाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी जितेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नियुक्त केली आहे. या समितीमध्ये दीपेंद्र सिंह हुड्डा आणि वर्षा गायकवाड यांची सदस्य म्हणून नियक्ती करण्यात आली आहे.
काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के.सी वेणूगोपाल यांनी ही स्क्रिनिंग समिती जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी जितेंद्र सिंहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, अजयकुमार लल्लू, आराधना मिसरा मोना आणि उत्तर प्रदेशातील सर्व काँग्रेस सेक्रेटरींचा समावेश आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
इतकेच नाही तर आगामी विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याबाबतही त्याच निर्णय घेणार असल्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस जोरदारपणे तयारीला लागली असल्याचे पाहायला मिळत आहे.