महाराष्ट्रात या भागांना हवामान खात्याकडून येलो अलर्ट
![Yellow Alert from Meteorological Department for these areas in Maharashtra](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/Yellow-Alert-from-Meteorological-Department-for-these-areas-in-Maharashtra.png)
मुंबई : राज्यात ऑगस्टच्या सुरुवातीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढावली आहे. अशात पुन्हा एकदा हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुणे, मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुणे, जळगावसह विदर्भात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर भंडारा जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. नदी-नाले पुन्हा तुंडुंब भरून वाहत असल्यामुळे नजीकच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याकडून १६ ऑगस्ट रोजी पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, कोकण आणि गोव्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं अशा सूचना देण्यात आला आहे.
गडचिरोलीमध्ये धुवांधार पावसाने पूर परिस्थिती…
गडचिरोली जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत असल्याने नदी-नाल्यांना पूर आला असून तब्बल २० मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. पुरामुळे भामरागड येथील १५० आणि देसाईगंज येथील हनुमान वॉर्डातील ४३ अशा एकूण १९३ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एका मदत केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ७५ कच्ची घरे आणि २ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.