breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रराजकारण

साताऱ्यात उद्धव ठाकरेंचा सरदार कोण?, या नावांची जिल्ह्यात जोरदार चर्चा

सातारा : उद्धव ठाकरेंसोबत आता नक्की कोण? असा प्रश्न राज्यात अनेक ठिकाणी उपस्थित होत आहे. सातारा जिल्ह्यातही असाच प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात शिवसेनेचा सरदार कोण?, हा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.

साताऱ्यात शिवसेना वाढवली आणि जोपासली ती आण्णा देशपांडे, नाना भोसले, हैबतराव नलावडे अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी. मात्र काळ जस जसा लोटत गेला तसा राष्ट्रवादीचा प्रभाव याठिकाणी वाढला. मात्र अजुनही काही तालुक्यांत कट्टर शिवसेनेचे कार्यकर्ते आणि गट पहायला मिळतात. १९९६ मध्ये लोकसभा निवडणुकीत कै. हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या रुपानं शिवसेनेने जिल्ह्याला एक खासदार सुद्धा दिला होता. त्यानंतर मात्र आजपर्यंत शिवसेनेचा एकही खासदार साताऱ्यातून पुन्हा निवडून आला नाही.

२०१९ च्या निवडणुकीत पाटणमधून शंभुराज देसाई तर कोरेगावमधून महेश शिंदें यांना आमदार म्हणून लोकांनी विधानसभेत पाठवलं. मात्र आता हे दोन्ही आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. शिवसेनेचे आमदार शंभुराज देसाई उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदेंसोबत त्यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. मात्र, ज्या शिवसेनच्या तिकीटावर ते ३ वेळा आमदार झाले, त्याच सेनेला आणि शिवसैनिकांना विचारात न घेता साहेबांनी स्वत:चं हित साध्याचं सुद्धा बोल्ल गेलं. यामुळे शिवसेनेचा पाटण तालुक्यातील मोठा गट शंभुराज यांच्यावर नाराज आहे. यामुळे त्यांच्यानंतर शिवसेनेचा जिल्ह्यातला पुढचा शिलेदार कोण? असा सवाल निर्माण झालाय.

शेखर गोरेंचं नाव आघाडीवर

शेखर गोरे हे आक्रमक आहेतच, ते मास लिडर म्हणूनही ओळखले जातात. आदित्य ठाकरेंच्या महिला मेळाव्याला ३० ते ४० हजार महिलांची गर्दी जमवून उद्धव ठाकरेंचं लक्ष त्यांनी या ठिकाणी वेधलं होतं. यामुळे शिवसेनेला भविष्यात सातारा जिल्ह्यात कडवी शिवसेना उभी करायची असेल तर शेखर गोरे हा एकमेव चेहारा सध्या उद्धव ठाकरें समोर असलेला पहायला मिळतोय.

शेखर गोरे हे २०१९ च्या निवडणुकीपासून उद्धव ठाकरेंच्याजवळ गेल्याचं सुद्धा पहायला मिळतंय. २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी स्वत:चे सख्खे बंधू जयकुमार गोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्या चिन्हावर लढली होती आणि जयकुमार हे भाजपाचे सध्याचे आमदार आहेत. ते भाजपचे नवीन जिल्हाध्यक्षही आहेत. यामुळे शेखर गोरे हे भाजप आणि पर्यायाने राष्ट्रवादीला टक्कर देवू शकतात, अशी चर्चा आहे.

शेखर गोरे हे सध्या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत. यामुळे जिल्ह्यात शिवसेनेची बांधनी करत असताना सर्वांना टक्कर देवून आपला निशाणा साधेल असा कार्यकर्ता आपल्या भात्यात असणं उद्धव ठाकरेंना गरजेचं आहे. उद्धव ठाकरेंना सेनेच्या पुर्णबांधनीसाठी शेखर गोरे हे नाव अगदी फिट होतं, असं सुद्धा दबक्या आवाजात बोललं जातंय. शेखर गोरे यांनी शरद पवारांपासून रामराजे निंबाळकर आणि चक्क बंधू जयकुमार गोरेंचा अनेक वेळा रोष ओढवून घेत यांना शिंगावर घेतलंय. शेखर गोरे हे भल्या भल्यांना घाम फोडण्याची ताकद ठेवतात. त्यामुळे शिवसेनेचे ढासळेले बुरुज दुरुस्त करून जिल्ह्यात सेनेला पुन्हा गतवैभव मिळवून द्यायचं असेल तर शेखर गोरे एवढा प्रभावी नेता सध्या दुसरा नसल्याची चर्चा जिल्ह्यात आहे.

हर्षद कदम यांचाही उद्धव ठाकरेंपुढे पर्याय

पूर्वी ज्यांच्यावर सातारा जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी होती हे हर्षद कदम हे सुद्धा उद्धव ठाकरें पुढे पर्याय असू शकतात. हर्षद कदम हे आमदार शंभुराज देसाई यांना विरोध करण्याची ताकद ठेवतात. मात्र हर्षद कदम यांचं जिल्ह्याबाहेरील वास्तव्य आहे. यामुळे जिल्ह्यात त्यांचा किती प्रमाणात प्रभाव पडेल, ते प्रत्येक तालुक्यात गट बांधू शकतील का? हे पाहणंही महत्त्वाचं असेल. आक्रमक चेहेरा शिवसेनेला हवाय. यानुसार शिवसेनेचा जिल्ह्याचा पुढचा सेनापती कोण? हा येणारा काळ आणि उद्धव ठाकरेच ठरवणार असले तरी शेखर गोरेंच्याकडे शिवसेनेची जिल्ह्याची सूत्रे जातील का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.

सध्या एकनाथ शिंदेंच्या गटाने साताऱ्यात फोडाफोडीचं सत्र सुरू केल्याचं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून समजतंय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांची बंडाळी आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार यांच्यामुळे आता खालच्या फळीतील शिवसैनिकांना एकनिष्ठ राहून उद्धव ठाकरे आणि पक्षासाठी काम करून दाखवण्याची आयती संधीच चालून आली आहे. आता या संधीचा फायदा जिल्ह्यात नक्की कोण उचलतंय हे पाहणं औत्सुक्याचं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button