राज्यात पुढचे ३-४ तास मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईसह ‘या’ भागांना ऑरेंज अलर्ट जारी
![Warning of heavy rains for next 3-4 hours in the state, Orange alert issued to 'Ya' areas including Mumbai](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Warning-of-heavy-rains-for-next-3-4-hours-in-the-state-Orange-alert-issued-to-Ya-areas-including-Mumbai.png)
मुंबई : राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये जोरदार पाऊस झाला. काल दिवसभर पावसाची बॅटिंग सुरू असल्यामुळे अनेक शहरांमध्ये पाणी साचल्याचंही पाहायला मिळालं. अशात आता हवामान खात्याकडून पुन्हा एकदा तुफान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील ३-४ तासांत मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
गेल्या २४ तासात कुलाबा वेधशाळेत २२७ आणि सांताक्रूझ वेधशाळेत १७५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. अशात सध्या मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, पालघरवर मध्यम ते तीव्र तीव्रतेचे ढग असून पुढच्या काही तासांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे मुंबईकरांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
आज सकाळपासूनही मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याने मुंबई आणि कोकणाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत या दोन्ही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात कोकणात, सांगली, सातारा, नाशिक या जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे. पण पुण्यात अद्यापही मनासारखा पाऊस झाला नाही. काल हलक्या सरी कोसळल्या असल्या तरी चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.
काल दिवसभरात रत्नागिरी येथे ८३, अलिबाग येथे ५२, डहाणू येथे २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोकण विभाग सोडून उर्वरित महाराष्ट्रामध्ये दिवसभरात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोल्हापूर, महाबळेश्वर आणि सांगली येथे अनुक्रमे ९, ८ आणि ५ मिलिमीटर पाऊस झाला. विदर्भात अमरावती येथे १६ आणि यवतमाळ येथे १४ मिलिमीटर पाऊस नोंदला गेला. बुलडाणा येथे ६, तर नागपूर येथे ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.