Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

राज्यामध्ये येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

मुंबईः राज्यामध्ये येत्या चार ते पाच दिवसांत पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सोमवारी प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अद्ययावत इशाऱ्यानुसार पालघरमध्ये गुरुवारपर्यंत ‘रेड अलर्ट’ तर मुंबई-ठाण्यामध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरीलाही मंगळवारसाठी ‘रेड अलर्ट’ असून नाशिक, पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिम किनाऱ्यावरील द्रोणिय स्थिती, पूर्व-पश्चिम वाऱ्याचे क्षेत्र, ‘मान्सून ट्रफ’ त्याच्या सामान्य स्थितीच्या दक्षिणेकडे स्थित या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून ४-५ दिवसांमध्ये कोकण विभाग,मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी मुसळधार‌ पाउस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातही पावसाचा जोर असेल अशी माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली आहे. गेल्या आठवड्यातही ही अनुकूल स्थिती होती. मात्र राज्यात अपेक्षित पाऊस पडला नाही. या आठवड्यात मात्र राज्यातील पावसाची परिस्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबई परिसर, कोकणमधील स्थिती

– मुंबईमध्ये सोमवारी मात्र फारसा पाऊस पडला नाही.

– सांताक्रूझ येथे ९.२ तर कुलाबा येथे ७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

– स्वयंचलित यंत्रणेच्या नोंदीनुसारही मुंबई परिसरात २० मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस दिवसभरात पडला नाही.

– कल्याण-डोंबिवली परिसरात मात्र तुरळक ठिकाणी ४० ते ६० मिलीमीटर दरम्यान पावसाची नोंद झाली.

– रायगड जिल्ह्यामध्ये मंगळवार आणि बुधवारी रेड अलर्ट आहे, तर रत्नागिरीमध्ये मंगळवारी रेड अलर्ट देण्यात आला आहे. इतर दिवशी शुक्रवारपर्यंत ऑरेंज अलर्ट म्हणजे तुरळक ठिकाणी मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.

– सिंधुदुर्गामध्येही शुक्रवारपर्यंत मुसळधार ते अती मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण कोकणात सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढल्याची नोंद झाली.

नाशिकसह उर्वरित महाराष्ट्र

– कोकण विभागासोबतच नाशिक, पुणे घाट परिसरात गुरुवारपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे.

– कोल्हापूरमध्ये मंगळवारी रेड अलर्ट असून इतर दिवशी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

– सातारा येथेही घाट परिसरात पुढील चार ते पाच दिवसांमध्ये मुसळधार ते तीव्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

– नाशिक जिल्ह्यात सोमवारी सुरगणा येथे सायं. ५ पर्यंत १४०.५, त्रिंब्यक येथे ९३, इगतपुरी येथे १०३ तर पेठ येथे १६८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

– मराठवाड्यात औरंगाबाद आणि जालन्यामध्ये मंगळवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाची शक्यता आहे.

– विदर्भात गडचिरोली येथे मंगळवारी रेड अलर्ट आहे.

– चंद्रपूर येथे मंगळवारी ऑरेंज अलर्ट आहे तर नागपूर, अकोला, अमरावती येथे बुधवारी तुरळक ठिकाणी अती मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी

पालघरसाठी गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी सोमवारी अती तीव्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी सकाळपासूनच पावसाचा जोर वाढलेला होता. सकाळी आठ ते संध्याकाळी सहापर्यंत जव्हार येथे १७५ मिलीमीटर, मोखाडा येथे १४१.८ तर वाडा येथे १०७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. ठाणे जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत तुरळक ठिकाणी तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबईतही गुरुवारपर्यंत तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला असेल. काही ठिकाणी तीव्र मुसळधार पाऊस पडू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button