कृष्णा नदीतील माशांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा कृष्णा नदीत हजारो मासे मृत्यूमुखी, शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा
![The season of fish deaths in the Krishna River continues. Thousands of fishes are dying in Krishna river again today, farmers' association warns of agitation](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/The-season-of-fish-deaths-in-the-Krishna-River-continues.-Thousands-of-fishes-are-dying-in-Krishna-river-again-today-farmers-association-warns-of-agitation.jpg)
सांगली : गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीतील माशांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. आज पुन्हा कृष्णा नदीत हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचे दिसल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेचे वातावरण आहे. कृष्णा काठावरील कसबे डिग्रज येथील बंधाऱ्याच्या ठिकाणी हजारो मासे तडफडून मरण पावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या माशांच्या मृत्यूचे गूढ निर्माण झाले. प्रदूषण महामंडळाकडून आणि मत्स्य विभागाकडून नदीतल्या आतापर्यंतच्या माशांच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आले नाही. दरम्यान, मासे मृत्यू प्रकरणी स्वतंत्र भारत पक्ष,शेतकरी संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सांगलीच्या कृष्णा नदी पात्रांमधील असणारे लाखो मासे काही दिवसांपूर्वी मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. भिलवडीच्या आमणापूरपासून सांगलीच्या हरिपूरपर्यंत कृष्णाकाठी मृत माशांचा अक्षरश: खच पडला. तडफडून मरणाऱ्या माशांना पकडण्यासाठी नदीकाठी नागरिकांचीही झुंबड उडाली होती. या घटनेनंतर प्रदूषण महामंडळाने नदीच्या पात्रातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत. याप्रकरणी तपास देखील सुरू केला आहे.
मात्र माशांचे मृत्युचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना अजून ताजी असताना, पुन्हा एकदा कृष्णा नदीच्या पात्रात पुन्हा एकदा माशांच्या मृत्यूचे प्रकार समोर आल्याने चिंता वाढली आहे. कसबे डिग्रज पासून अनेक ठिकाणी नदीकाठावर मासे कडेला येऊन तडफडून मृत्यू पडत असल्याच्या घटना बुधवारी समोर आली आहे. त्यानंतर हे मासे घेऊन जाण्यासाठी अनेकांनी नदीकाठी गर्दी केली होती.
तर, मृत माशांमुंळे मोठी दुर्गंधी पसरत असल्याने ग्रामपंचायतीकडून या माशांच्या विल्हेवाट लावण्यात आला आहे. पण आता पुन्हा एकदा हा प्रश्न निर्माण झाला आहे की, हे मासे पुन्हा मृत्युमुखी कसे पडले ?, या माशांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय ?, खरेच या नदीपात्रामध्ये माळी मिश्रित रासायनिक पाणी काही कारखान्यांद्वारे सोडले जात आहे का ?, या प्रश्नांच्या मुळाशी जाणे गरजेचे बनले आहे. तर स्वतंत्र भारत पक्ष शेतकरी संघटनेकडून या प्रकरणी तातडीने माशांचे मृत्यू थांबवावेत आणि संबंधितांच्यावर कारवाई करावी ,अन्यथा मृत मासे थेट प्रदूषण मंडळाच्या कार्यालयात फेकून देण्यात येतील, असा इशारा देण्यात आला आहे.