राज्यात मान्सूनपूर्व हंगाम ठरला कोरडा, सात जिल्ह्यांत शून्य पाऊस; १४ जिल्ह्यांत कमी पावसाची नोंद
![The pre-monsoon season in the state was dry, with zero rainfall in seven districts; Record of low rainfall in 14 districts](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/The-pre-monsoon-season-in-the-state-was-dry-with-zero-rainfall-in-seven-districts-Record-of-low-rainfall-in-14-districts.jpg)
पुणे : राज्यात मार्च ते मे या उन्हाळा किंवा मान्सूनपूर्व हंगामात बहुतांश जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये या तीन महिन्यात शून्य टक्के; तर १४ जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ६० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला. भारतीय हवामानशात्र विभागाच्या (आयएमडी) पर्जन्यमानाच्या आकडेवारीमधून मान्सूनपूर्व हंगामाचे हे कोरडे चित्र समोर आले.
‘आयएमडी’च्या नोंदींनुसार जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या चार महिन्यांसोबत मार्च ते मे या मान्सूनपूर्व आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या मान्सूनोत्तर हंगामांतही पावसाची नोंद होत असते. उन्हाळ्यात स्थानिक पातळीवर वाढलेले तापमान आणि समुद्रावरून आलेले बाष्प यांच्या संयोगाने उंच ढगांची निर्मिती होऊन विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह राज्यभर पावसाच्या सरी कोसळतात. कमाल तापमानाचा पारा वाढत असताना अशा पावसामुळे तापमान काही प्रमाणात मर्यादेत राहत असते.
यंदा मात्र, गोंदिया, अमरावती, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये सर्वसाधारण (सरासरीपेक्षा १९ टक्के कमी ते १९ टक्के जास्त), मुंबई उपनगरे आणि नाशिकमध्ये जास्त (सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के जास्त) आणि कोल्हापूर, नगर, बीड या जिल्ह्यांमध्ये अतिजास्त (६० टक्क्यांहून जास्त) पावसाची नोंद झाली. हे जिल्हे वगळता राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाने नावापुरतीच हजेरी लावली.
‘आयएमडी’च्या आकडेवारीनुसार भंडारा, वाशीम, हिंगोली, जालना, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये मार्च ते मे या तीन महिन्यांत शून्य टक्के पावसाची नोंद झाली. गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर, वर्धा, नांदेड, लातूर, परभणी, अकोला, सातारा, पुणे, मुंबई, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ६० ते ९९ टक्के कमी; तर सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, धुळे या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा २० ते ५९ टक्के कमी पाऊस नोंदला गेला.
उष्णतेच्या लाटांचा परिणाम?
मान्सूनपूर्व हंगामातील पावसामुळे काही प्रमाणात जमिनीतील बाष्प टिकून राहण्यास; तसेच पाणीसाठ्यांमधून बाष्पीभवनाचा वेग मंदावण्यास मदत होते. जैवविविधतेच्या दृष्टीनेही मान्सूनपूर्व पावसाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. यंदा उन्हाळा कोरडा गेल्यामुळे उष्णतेच्या लाटांचा परिणामही अधिक जाणवला, असे जाणकारांचे म्हणणे आहे.