Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम- एकनाथ शिंदेंच्या भेटीने तर्कवितर्कांना उधान
![The meeting of senior legal expert Ujjwal Nikam- Eknath Shinde sparks arguments](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/हायप्रोफाईल-खटले-लढवणारे-उज्ज्वल-निकम-एकनाथ-शिंदेंच्या-भेटीला-तर्कवितर्कांना-उधाण.jpg)
ठाणे: एकेकाळी राज्यातील हायप्रोफाईल खटल्यांमध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम करणारे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. उज्ज्वल निकम हे गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर ही भेट झाली. या भेटीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांच्याशी नेमकी काय चर्चा केली, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरु आहे. त्याच अनुषंगाने एकनाथ शिंदे आणि उज्ज्वल निकम यांच्यात चर्चा झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना फुटल्याने सत्तांतर झाले होते. त्यामुळे राज्यात सत्तासंघर्ष सुरु झाला होता. त्यानंतर शिंदे गटातील १६ आमदारांची अपात्रता आणि शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरून कायदेशीर लढाई सुरु आहे. या सगळ्या नाट्यादरम्यान उज्ज्वल निकम हे अनेकदा प्रसारमाध्यमांमधून कायदेशीर पैलू उलगडताना दिसत होते. त्यांनी वृत्तवाहिन्यांवरील चर्चांदरम्यान पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेणार का, हेदेखील पाहावे लागेल.