आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून, अनेक अभ्यासक्रमांची शुल्कवाढही कमी करण्याचे लेखी आश्वासन
![The IIT administration has agreed to most of the demands of the students and also promised in writing to reduce the fee hike for many courses](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/The-IIT-administration-has-agreed-to-most-of-the-demands-of-the-students-and-also-promised-in-writing-to-reduce-the-fee-hike-for-many-courses.png)
मुंबई : आयआयटी प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या असून, अनेक अभ्यासक्रमांची शुल्कवाढही कमी करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. प्रशासनाने नरमाईची भूमिका घेतल्यामुळे विद्यार्थ्यांनी शुक्रवारी तूर्तास आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले.
संस्थेच्या गुरुवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या बैठकीत शुल्कवाढीबाबत चर्चा करण्यात आली. यानंतर ही शुल्कवाढ काही प्रमाणात मागे घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. बैठकीला आयआयटीचे शिक्षण उपसंचालक, अधिष्ठाता, कुलसचिव, विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते. प्रशासनाने सुमारे ४० टक्क्यांपर्यंत शुल्कवाढ कमी केली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. तसेच नवीन शुल्काची यादीही देण्यात आल्याने जल्लोष करत आयआयटी संकुलात विजयी रॅली काढून आनंद साजरा करण्यात आला. मात्र,तरी विद्यार्थी हक्कासाठी, तसेच सर्वांना शिक्षण अधिकार मिळण्यासाठी आमचा पुढचा लढा सुरू राहील, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
प्रशासनाने एमटेक, पीएचडी, एमएसएससी, आदी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश, शैक्षणिक शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये एमटेचे मुख्य शुल्क हे १५ हजार रुपयेच राहणार असले तरी पीएचडीच्या शुल्कात एक हजार २५० आणि इतर शुल्कात मोठी कपात केली आहे. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनात पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, नोंदणी, जिमखाना, विद्यार्थी कल्याण निधी, अपघात विमा आदींमध्ये मोठी कपात केली आहे. एमटेक, पीएचडीसह विविध अभ्यासक्रमांच्या शुल्कात ५१ टक्क्यांहून अधिक शुल्ककपात करण्यात आली आहे.
असे असेल नवे शुल्क
प्रकार रक्कम
प्रवेशशुल्क २,५५०
ग्रॅज्युएशन ट्रान्सक्रिप्ट ६००
वैद्यकीय तपासणी ५००
तात्पुरते प्रमाणपत्र ६००
विद्यार्थी सहाय्यता निधी १,१५०
आधुनिकीकरण २,९९०
ओळखपत्र ६००
एकूण ८,९००