Uncategorizedताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘तलवारीस तलवार भिडणार’; एकनाथ शिंदेंच्या शक्तिप्रदर्शनानंतर शिवसेनाही आक्रमक भूमिकेत

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांसह पुकारलेलं बंड आणखी तीव्र करत जोरदार शक्तिप्रदर्शन केलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत असलेल्या जवळपास ३५ आमदारांसह फोटोशूट करत पक्षनेतृत्वाला आव्हान दिलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आक्रमक भूमिका घेतली असून या भूमिकेचं प्रतिबिंब शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातही उमटलं आहे. सामनातून शिवसेनेतील बंडखोरांना निर्वाणीचा इशारा देण्यात आला आहे.

‘धर्माच्या मुखवट्याखाली अधर्माशी संग करणाऱ्यांना जनता माफ करील काय? हे खरे प्रश्न आहेत. संकटांशी व वादळांशी सामना करण्याची शिवसेनेला सवय आहे. गुजरातच्या भूमीवरून फडफड करणाऱ्यांनी हा इतिहास पुन्हा एकदा समजून घ्यावा. गुजरातमध्ये या मंडळींनी जरूर दांडिया खेळावा, पण महाराष्ट्रात तलवारीस तलवार भिडेल हे नक्कीच,’ अशा आक्रमक शब्दांत सामनातून भूमिका मांडण्यात आली आहे.

आमदारांना मारहाण आणि हृदयविकाराचा झटका
एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या आमदारांबाबत ‘सामना’च्या अग्रलेखातून गंभीर आरोप करण्यात आला आहे. ‘सोमवारी विधान परिषदेत दहावी जागा जिंकताच शिवसेनेच्या दहाएक आमदारांना ‘उचलून’ गुजरातला नेण्यात आले. त्यांच्या भोवती कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. यातील दोन-चार आमदारांनी या गराड्यातून सुटण्याचा व पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शारीरिक इजा होईपर्यंत मारहाण करण्यात आली. अकोल्याचे आमदार नितीन देशमुख यांना तर इतकी मारहाण झाली की त्यांना हृदयविकाराचा झटका आला व इस्पितळात दाखल करावे लागले. कैलास पाटील हे आमदार घेराबंदीतून सटकले व भर पावसात चालत रस्त्यावर येऊन कसेबसे मुंबईस पोहोचले. अशाप्रकारे चार-पाच आमदारांनी सुटकेचा प्रयत्न केला तेव्हा गुजरात पोलिसांनी त्यांना अटक करून ‘ऑपरेशन कमळ’वाल्यांच्या ताब्यात दिले. हा काय प्रकार आहे? अशाने लोकशाहीची काय इभ्रत राहणार आहे?’ असा संतप्त सवाल शिवसेनेनं विचारला आहे.

दरम्यान, ‘विधान परिषदेतील दहाव्या जागेचा विजय भाजपने मिळवला तो शिवसेनेतील तथाकथित निष्ठावंत वगैरे म्हणवून घेणाऱ्या लोकांना बेइमान करून. या निवडणुकीत काँगेसचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पाडून भाजपने विजय मिळवला. हंडोरे हे मुंबईतील दीन-दलित समाजाचे नेते आहेत. अशा दीन-दलितास पाडून भाजपने बेइमानांच्या मतांवर विजयोत्सव साजरा केला. त्याच बेइमानांना लगेच गुजरातच्या भूमीवर नेऊन जोरदार सरबराई सुरू झाली. शिवसेनेचे दोन उमेदवार सचिन अहिर व आमशा पाडवी विजयी झाले, पण त्यांच्या अधिकृत मतांतही घाटा दिसत आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार जिंकले, पण मतांची फाटाफूट घडवून भाजपने जो पाचवा विजय मिळवला ती कपटनीती म्हणजे भाजपचा खरा चेहरा आहे,’ असा घणाघातही ‘सामना’तून करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button