Swine Flu : चिंताजनक! ठाण्यात नौपाडा परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू
![Swine Flu : Alarming! A 60-year-old man living in Naupada area of Thane died due to swine fluSwine Flu : Alarming! A 60-year-old man living in Naupada area of Thane died due to swine flu](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Swine-Flu.jpg)
ठाणे : ठाण्यात नौपाडा परिसरात राहणाऱ्या एका ६० वर्षीय वयोवृद्ध व्यक्तीचा स्वाइन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ठाण्यातील ही स्वाइन फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. कोरोनामध्ये दोन वर्ष लॉकडाऊनला समोर गेल्यानंतर आता या स्वाइन फ्ल्यू मुळे परिसरात धाकधूक लागलेली पाहायला मिळत आहे.
ठाण्यातील नौपाडा येथील स्टेशन जवळील बी कॅबीन परिसरात राहणाऱ्या ६० वर्षीय वयोवृद्धाचा स्वाइन फ्ल्यू मुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ठाण्यात स्वाइन फ्लूमुळे हा पहिलाच बळी गेल्यामुळे परिसरात धाकधूक वाढली आहे. दोन वर्ष कोरोनाची दोन हाथ केल्यानंतर कुठे तरी आताच कोरोनाचा संसर्ग कमी झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मात्र कोरोना पाठोपाठ आता स्वाइन फ्लू मुळे पहिला बळी गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशोक रावजी जाधव असे मृत्यू झालेल्या ६० वर्षिय वयोवृद्ध व्यक्तीचे नाव समोर येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार अशोक जाधव यांची प्रकृती काही दिवसांपासून सुधारत नव्हती. तब्येत बिघडली म्हणून उपचारासाठी त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती सुधारत नसल्याने अशोक जाधव यांना मुंबई येथील केईएम रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मुंबईच्या केईएम रुग्णालयात उपचार सुरू असताना अशोक जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
चार दिवस उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी अशोक जाधव यांना काही तपासण्या करण्यास सांगितले होत्या आणि या तपासण्यांदरम्यान अशोक जाधव यांच्या एका रिपोर्टमध्ये स्वाइन फ्ल्यू असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर अशोक जाधव यांचा स्वाईन फ्ल्यू मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.