चांगभलं प्रतिष्ठानच्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
दहा लकी ड्रॉ विजेत्यांना पैठणी, सात विजेत्यांना आकर्षक बक्षीस

पिंपरी चिंचवड : चांगभलं प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या घरगुती सजावट स्पर्धेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये तब्बल अडीचशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाचा उत्साह वाढवण्यासाठी विविध बक्षिसांची मेजवानी ठेवण्यात आली असल्याचे चांगभलं प्रतिष्ठानचे आयोजक सागर थोरात यांनी सांगितले.
या स्पर्धेतील खास आकर्षण लकी ड्रॉद्वारे देण्यात आलेल्या पैठण्या ठरत आहे. एकूण दहा विजेत्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पारंपरिक व आकर्षक अशा पैठण्या भेट देण्यात येणार आहे. याशिवाय मुख्य स्पर्धेतील सात विजेत्यांची निवड करून त्यांना टीव्ही, फ्रिज, मोबाईल, गॅस शेगडी यांसारखी उपयोगी व आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
हेही वाचा : मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण चालू
या स्पर्धेचा अंतिम निकाल आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती चांगभलं प्रतिष्ठानचे आयोजक सागर थोरात यांनी दिली. त्यांनी पुढे सांगितले की, “सर्वच सहभागी स्पर्धकांना पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह वाढवण्याचा आमचा उद्देश आहे. नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद हा खूपच प्रेरणादायक आहे.”
स्पर्धेच्या निमित्ताने नागरिकांमध्ये सामाजिक दायित्व वाढवण्याबरोबरच सामाजिक एकोपा आणि सहभागाचाही सुरेख अनुभव या उपक्रमातून घेता आला, असे आयोजक सागर थोरात यांनी नमूद केले.