सफाई कामगारांसाठी ‘श्रम साफल्य’, हक्काचा निवारा मिळला : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आदर्श उपक्रम
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/08/PCMC.jpeg)
पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
२५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या सफाई कर्मचा-यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजने अंतर्गत महापालिकेच्या वतीने देण्यात येणा-या सदनिका वितरणाची सोडत अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, मुख्य वित्त व लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, आरोग्य विभागाचे उपआयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
सफाई कर्मचारी आपले आरोग्य धोक्यात घालून शहर स्वच्छ ठेवून समाजाची सेवा करीत आहेत, हे त्यांचे विशिष्ठ स्वरुपाचे काम आणि त्यांचा सामाजिक व आर्थिक दर्जा विचारात घेऊन, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्यातील नगरपालिकेतील, महानगरपालिकेतील सफाई कर्मचा-यांना सेवानिवृत्तीच्यावेळी मालकी हक्काने मोफत सदनिका देणे तसेच सेवेत असताना त्यांच्याकरिता सेवानिवासस्थाने बांधण्यास चालना देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सफाई कामगारांचे विशिष्ठ स्वरुपाचे काम विचारात घेवून ज्या सफाई कामगारांची सेवा २५ वर्ष किंवा त्याहून अधिक झाली आहे असे कर्मचारी तसेच सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त अथवा मयत कर्मचारी अथवा त्यांचे पात्र वारसदार यांना २६९ चौरस फुट चटई क्षेत्राची मोफत सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
७३ सदनिकांची काढली सोडत…
महापालिकेच्या आरोग्य विभागांतर्गत ज्या सफाई कर्मचा-यांच्या नावावर आजतागायत कोणतीही मिळकत नाही तसेच त्यांच्या पती किंवा पत्नी यांच्या नावावर देखील मिळकत नाही, तसेच ज्यांनी सदनिका घेण्याकरीता महापालिकेमार्फत उपलब्ध कोणताही लाभ घेतला नाही अशा ७३ सफाई संवर्गातील पात्र कर्मचा-यांना महापालिकेच्या दापोडी येथील गणेश हाईटस्, सुखवानी वुडस आणि गणेश किनारा या इमारतीमधील सदनिका देण्याचे निश्चित केले आहे. गणेश हाईट या इमारतीमध्ये ३६ सदनिका, सुखवानी वुडस इमारतीमध्ये २५ सदनिका, गणेश किनारा या इमारतीमध्ये १२ सदनिका अशा एकूण ७३ सदनिकांची सोडत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आली.