Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

धक्कादायक! मुंबईत दररोज चार मुलींचे अपहरण; चिंताजनक आकडेवारी आली समोर

मुंबई : मुंबईमध्ये अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चिंताजनक स्थिती असून यात १५ ते १७ वर्षे वयोगटातील मुलींचे प्रमाण अधिक आहे. दररोज सरासरी चार अल्पवयीन मुलींचे अपहरण होते. यातील बहुतांश प्रकरणांमध्ये लग्नाचे आमिष दाखविले जात असल्याचे दिसते. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांत ४६८ मुलींचे अपहरण झाले असून यातील ३५८ मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. सन २०२१मध्ये अपहरणाचे एक हजार ९३ गुन्हे दाखल करण्यात आले होते, त्यापैकी ९४२ मुलींचा शोध लागला.

गेल्या आठवडाभरातही अशा काही घटना समोर आल्या आहेत. गोरेगाव पश्चिम येथील गणेशनगरमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील नववीत शिकणारी मुलगी शाळेत जाते, असे सांगून घरातून बाहेर पडली. नेहमीच्या वेळेत ती न परतल्याने आई-वडिलांनी तिच्या मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली. त्यावेळी ती शाळेत गेली नसल्याचे समोर आले. रात्री उशिरापर्यंत शोधाशोध करूनही मुलगी सापडत नसल्याने कुटुंबीयांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. धारावीमधील फर्निचरच्या व्यापाऱ्याची १६ वर्षांची मुलगी संध्याकाळी काहीच न सांगता घराबाहेर पडली, ती पुन्हा परतलीच नाही. मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेले, असा आरोप व्यापाऱ्याने केला. धारावी पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

पवईच्या साकीविहार रोड येथे वास्तव्यास असलेल्या १७ वर्षांच्या मुलीचे त्याच परिसरातील एका मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांना होता. जूनच्या शेवटच्या आठवड्यात ही मुलगी काही न सांगता घराबाहेर पडली. ती परतलीच नाही. लग्नाचे आमिष दाखवून त्याच मुलाने तिला पळवून नेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कांदिवली येथील एका व्यापाऱ्याच्या घरामध्ये काम करणाऱ्या महिलेची अल्पवयीन बहीणही बेपत्ता झाली आहे. पोलिस तिचा शोध घेत आहेत. मुंबईतून अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना दिवसागणिक वाढत आहेत. यातील अनेक प्रकरणे प्रेमसंबंधातून झाली असली, तरी मुली अल्पवयीन असल्याने पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो.

अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना

वर्ष गुन्हे उकल

२०२० ७७३ ६७३

२०२१ १०९३ ९४२

२०२२ (मे) ४६८ ३५८

प्रमुख कारणे

समाजमाध्यमांचा अतिवापर

पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष

शाळा-कॉलेजांमध्ये तरुणांचा सहवास अधिक

चित्रपटातील प्रेमकथांचा विपरित परिणाम

लैंगिक शोषण करून ब्लॅकमेलिंग

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button