शिंदे गटाच्या बंडखोरांचा पुढचा मुक्काम गोव्यात, पंचतारांकित हॉटेलमध्ये ७१ खोल्या बुक
![Shinde group rebels stay in Goa, book 71 rooms in five-star hotel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/Shinde-group-rebels-stay-in-Goa-book-71-rooms-in-five-star-hotel.jpg)
मुंबई: राज्यात गेल्या २४ तासात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. एकीकडे भाजप या सत्ता नाट्यात उघडपणे पुढे आली आहे, तर दुसरीकडे गुवाहाटीत असलेले शिंदे गटातील बंडखोर आमदारांनीही मुंबईत परतण्याची तयारी केली आहे. उद्या सर्व आमदार मुंबईत बहुमत चाचणीसाठी येतील, असं बंडखोर नेते एकनाथ शिंदेंनी सांगितलं. हे सर्व बंडखोर नेते आज गोव्यात जाणार असल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी गोव्यातील हॉटेलमध्ये ७१ खोल्याही आरक्षित करण्यात आल्याची माहिती आहे.
भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल रात्री राजभवनात जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेत त्यांना सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगण्यात यावे यासाठी पत्र दिले. त्यानंतर आज राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सरकारने बहुमत सिद्ध करावं, असे निर्देश देणारं पत्र पाठवलं. गुरुवारी सकाळी ११ वाजता विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. यावेळी ठाकरे सरकारला सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागेल. सायंकाळी ५ वाजेपर्यंत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
या बहुमत चाचणीसाठी गुवाहाटीला असलेले शिंदे गटातील बंडखोर आमदरही उपस्थित राहणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्या बहुमत चाचणीसाठी आम्ही मुंबईत येणार असं त्यांनी सांगितलं. “मी आताच कामाख्या देवीचं दर्शन घेतलं, महाराष्ट्रातील जनतेच्या समाधानासाठी, सुखासाठी आणि समृद्धीसाठी मी देवीचे आशीर्वाद घेतले, आम्ही सर्व आमदारांना घेऊन अविश्वास प्रस्तावाची प्रक्रिया पार पडण्यासाठी मुंबईत जाणार आहोत, आमच्यासोबत असलेले सर्व आमदार उद्या मुंबईत पोहोचतील”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
मात्र, त्यापूर्वी शिंदे गट हा गोव्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ताज कन्व्हेन्शन हॉटेलमध्ये राहणार असल्याची माहिती आहे. त्यासाठी हॉटेलमधील ७१ खोल्या बुक करण्यात आल्या असून दुपारी साडेचार वाजेपर्यंत आमदार हॉटेलमध्ये पोहोचतील, अशी माहिती आहे.
ठाकरे सरकार अजचणीत, बहुमत सिद्ध करावं लागणार
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले होते. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ३९ आमदार आपल्या गळाला लावले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला होता. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी राज्यपालांकडे धाव घेत ठाकरे सरकार अल्पमतात असल्याचा दावा केला होता. तेव्हाच राज्यपाल मुख्यमंत्री ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश कधी देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर राज्यपालांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन बोलावले आहे. ठाकरे सरकारला उद्या संध्याकाळी पाच वाजण्यापूर्वी सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. कोणत्याही परिस्थितीत बहुमत चाचणी प्रक्रिया पुढे ढकलता येणार नाही. तसेच सभागृह तहकूब करता येणार नाही. या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात येणार आहे, असा सूचनाही राज्यपालांनी पत्रात दिल्या आहेत.