सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करा, मोहित कंबोज यांचं तिसरं खळबजनक ट्विट
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी दोन खळबळजनक ट्विट केली आहेत. मोहित कंबोज यांनी लवकरच पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता लवकरच अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना भेटायला जाईल, असं ट्विटमधून कंबोज यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा तो नेता नेमका कोण असेल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. मोहित कंबोज लवकरच पत्रकार परिषद घेऊन कोणत्या नेत्यावर आरोप करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देईल हे पाहालं लागणार आहे. तिसऱ्या ट्विटमध्ये मोहित कंबोज यांनी २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी बंद केलेल्या सिंचन घोटाळा प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मोहित कंबोज यांचं पहिलं ट्विट
हे ट्विट सेव्ह करुन ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठ्यात मोठा नेता लवकरच नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना भेटणार असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलं आहे. मोहित कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर संबंधित नेत्याविषयी तपास यंत्रणांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलं.
कंबोज यांचं दुसरं ट्विट
मोहित कंबोज यांनी ते लवकरच पत्रकार परिषद घेणार असून त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा भांडाफोड करणार असल्याचं म्हटलं. त्यामध्ये संबंधित नेत्याची भारतातील आणि परदेशातील संपत्ती, बेनामी कंपन्या, त्या नेत्याच्या मैत्रिणीच्या नावावर असलेली संपत्ती, विविध खात्यामध्ये मंत्री म्हणून काम करत असताना भ्रष्टाचार, त्या नेत्याच्या कुटुंबाचं उत्पन्न आणि संपत्तीची यादी पत्रकार परिषदेतून जाहीर करणार असल्याचं कंबोज यांनी म्हटलं आहे.
मोहित कंबोज यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणती भूमिका घेतली जाईल हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस सध्या प्रमुख विरोधी पक्ष आहे. उद्यापासून विधिमंडळ अधिवेशन सुरु होत आहे. त्यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षांना बॅकफूटवर ढकलण्याचा प्रयत्न आहे का, अशा चर्चा देखील सुरु आहेत.
मोहित कंबोज यांचं तिसरं ट्विट
मोहित कंबोज यांनी तिसरं ट्विट करत २०१९ मध्ये परमबीर सिंग यांनी सिंचन घोटाळ्याची बंद कलेली चौकशी पुन्हा सुरु करण्याची मागणी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.