वकिलांची फौज उभी करतो; “अंगावर आले तर शिंगावर घ्या, राज ठाकरेंचे मनसैनिकांना थेट आदेश
![Raises an army of lawyers; "If it comes, take it by the horns, Raj Thackeray's direct order to the Mansainiks](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Raj-Thakre-780x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही दिवसांपासून कोकण दौऱ्यावर आहेत. विविध तालुक्यांमध्ये जाऊन ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सोमवारी त्यांनी रत्नागिरी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात मोठं विधान केलं आहे. कुणी तुमच्या अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या. त्यांनी हात उचलला तर तुमच्याकडूनही हात उचललाच पाहिजे. मी वकिलांची फौज उभी करतो, अशा आशयाचं विधान राज ठाकरे यांनी केलं आहे.
कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले, “जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मी तीन सभा घेणार आहे. मुंबई, कुडाळ आणि चिपळून येथे या तीन सभा होणार आहेत. हा संपूर्ण दौरा पक्षाची घट्ट बांधणी करण्यासाठी होता. कोकणातले आपले कोकणवासीय आणि मुंबईस्थित कोकणवासीय यांच्यात मिलाप व्हावा, हा कोकण दौऱ्याचा हेतू होता.”