राज्यात पावसाचे रौद्ररुप; दोन दिवसांत तिघांचा वीज पडून मृत्यू, ही काळजी घ्या!
![Rains in the state; Take care of the three who were electrocuted to death in two days!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/राज्यात-पावसाचे-रौद्ररुप-दोन-दिवसांत-तिघांचा-वीज-पडून-मृत्यू-ही.jpg)
- खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांचे आवाहन
नागपूरः जिल्ह्यात गेल्यावर्षी २० लोकांचा वीज पडून मृत्यू झाला. १२ लोक नदी नाल्यात पडून वाहून गेले. यावर्षीही या संकटाचा सामना करावा लागू शकतो. गेल्या दोन दिवसांत तिघांचा वीज पडून मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
जिल्ह्यात मान्सूनला सुरुवात झाली आहे. यावर्षी १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली आहे. या काळामध्ये नैसर्गिक तथा मानवनिर्मित आपत्ती उद्भवण्याची शक्यता आहे. यामुळे मनुष्य, पशू आणि घरे, शेती पायाभूत सुविधा तसेच पर्यावरणाचेदेखील नुकसान होते, हा नुकसानाचा आकडा कमी व्हावा, यासाठी सतर्कता हाच यावरील प्रमुख उपाय असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाल्या.
ही घ्या काळजी
– विजांचा कडकडाट होत असताना घराबाहेर पडू नये
– शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाइल फोन सोबत बाळगू नये
– वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावीत
– अतिवृष्टी व वीजगर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये
– अतिवृष्टीच्या वेळी नदीस पूर आला असल्यास, नदी दुथडी भरून वाहत असल्यास नदी ओलांडण्याचा प्रयत्न करू नये