अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी, मान्सूनपूर्व धारा!
![Presence of torrential rains in Amravati district, pre-monsoon flow!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/05/Pre-Monsoon-Rain-Update-राज्यात-आणखी-एका-जिल्ह्यात-मुसळधार.jpg)
अमरावती : महाराष्ट्रात आणखी एका जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर, देशासह राज्यात सध्या मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाडा, विदर्भासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. अशात आता अमरावती जिल्ह्यातही मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले आहे. नांदेड, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांमध्येही पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
अमरावती जिल्ह्यात सध्या वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू आहे. तिवसा तालुक्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाला सुरुवात झाली असून शेतीच्या कामांनाही सुरुवात झाली आहे. बुधवारीही अमरावती शहरात वादळी पाऊस झाला. तर हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भात आणखी पावसाची शक्यता आहे.
हवामान विभागाने दोन दिवसांआघीच मुंबई, कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात मान्सून अलर्ट दिला होता. पश्चिमेकडे निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीय स्थितीमुळे देशातल्या बहुतेक राज्यात मान्सूनपूर्व सरी कोसळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरसह कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
दरम्यान, हवामान खात्याच्या अंदाजानुसार, कोकणात २९ मेपर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रा आणि विदर्भात आज कोरडे हवामान असून २९ मेपर्यंत ढगाळ वातावरण असेल, असा अंदाज आहे.